मालाडच्या आक्सा समुद्रकिनाऱ्यावर बुडणाऱ्या सहा शाळकरी मुलांना जीवरक्षकांनी प्रसंगावधान दाखवून वाचविल्याची घटना रविवारी संध्याकाळी चारच्या सुमारास घडली.
परीक्षा संपल्याने गोवंडी येथील काही शाळकरी मुले आक्सा समुद्रकिनारी सहलीसाठी आली होती. रविवारचा सुटीचा दिवस असल्याने येथे नेहमीपेक्षा गर्दी जास्त होती. दुपारी जेवणानंतर एका रिसॉर्ट समोरील पाण्यात ते उतरले. तेथे मोठा खड्डा होता़  यामुळे त्यांना खोलीचा अंदाज आला नाही आणि ते बुडू लागले. तेथील जीवरक्षकांनी आरडाओरड ऐकून त्वरीत त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. सलमान शेख (१६), फैजू शेख (१६), नेक शेख (१२) मन्सुर अन्सारी (१७) रझा शेख (१६) सरके आलम सजार (१३) अशी या वाचलेल्या मुलांची नावे आहेत. प्रवीण चव्हाण, सचिन मुळीक, जयेश, प्रीतम, समीर आदी जीवरक्षकांनी त्यांना वाचवले.