सहा लाख अ‍ॅप्स डाऊनलोडशिवाय पडून; विपणनावर मोठा खर्च होणार

एखाद्या वस्तूची लांबी- रुंदी मोजणाऱ्या अ‍ॅपपासून ते आपल्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या अ‍ॅप्सपर्यंत लाखो अ‍ॅप्सची गर्दी अ‍ॅप बाजारात झाली आहे. मात्र यापैकी सुमारे २५ टक्के अ‍ॅप्स डाऊनलोडशिवाय पडून आहेत. यामुळे अ‍ॅप बाजारातही आता कोंडी निर्माण झाली असून येत्या काळात अ‍ॅप चालविण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर विपणन खर्च करावा लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

स्मार्टफोन आणि त्यामधील अ‍ॅपमुळे आपली अनेक कामे एका क्लिकवर होत असली तरी ती करणाऱ्या अ‍ॅप्सची संख्या फारच कमी आहे. मात्र अनेक महत्त्वाच्या अ‍ॅप बाजारात लाखो अ‍ॅप्सनी गर्दी केली आहे. अँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणालीवर चालणाऱ्या अ‍ॅपसाठी असलेल्या गुगल प्ले या अ‍ॅपबाजारात गुरुवार १४ जुलै २०१६ रोजीच्या आकडेवारीनुसार २२ लाख ७० हजार ६०५ अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. तर अ‍ॅपल ऑपरेटिंग प्रणालीवर चालणाऱ्या अ‍ॅपसाठी असलेल्या अ‍ॅपबाजारात जून २०१६च्या आकडेवारीनुसार २२ लाख अ‍ॅप्स उपलब्ध असून विंडोज या ऑपरेटिंग प्रणालीसाठीच्या बाजारात सहा लाख ६९ हजार अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. अ‍ॅमेझॉन अ‍ॅप स्टोअरमध्ये सहा लाख; तर ब्लॅकबेरी वर्ल्डमध्ये २ लाख ३४ हजार ५०० अ‍ॅप्स उपलब्ध आहेत.

ऑपरेटिंग प्रणालींतील सुमारे सहा लाख अ‍ॅप डाऊनलोडशिवाय पडून असल्याची धक्कादायक माहिती नुकत्याच एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. तर सुमारे अडीच लाख अ‍ॅप्सना एक हजारपेक्षाही कमी डाऊनलोड असल्याची माहितीही समोर आली आहे. यातच आजमितीस गुगल प्ले स्टोअरवर जगभरातून दिवसाला १३०० तर अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर दिवसाला एक हजार अ‍ॅप्स नव्याने दाखल होत असतात. यामुळे भविष्यात ही संख्या आणखी वाढतच जाणार आहे. मात्र अँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणाली खुली असल्यामुळे बहुतांश अ‍ॅप सुरुवातीला गुगल प्ले या बाजारात दाखल होतात. यामध्ये व्यावसायिक अ‍ॅप्ससोबत हौशी, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तसेच कालमर्यादा असलेल्या अ‍ॅप्सचीही गर्दी असते.

या गर्दीतून मोबाइलधारक लोकप्रिय आणि उपयुक्त अ‍ॅप्सना पसंती देत असल्यामुळे प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये सरासरी ३२ अ‍ॅप्स असतात. यातीलही काही अ‍ॅप्स वापराविना पडून असतात. बहुतांश मोबाइलधारक मोफत अ‍ॅप्सना पसंती देत असल्यामुळे पैसे आकारलेले केवळ नऊ ते दहा टक्केच अ‍ॅप्स डाऊनलोड होताना दिसतात.

मोबाइल अ‍ॅप विकसित करण्याचे तंत्र कमी गुंतवणूक करून सध्या सहज उपलब्ध होत असल्यामुळे अ‍ॅप विकसित करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचबरोबर एका क्लिकच्या आधारे अब्जावधी लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम म्हणूनही अ‍ॅपकडे पाहिले जाते.

गुगल प्ले स्टोअरवर एखादे अ‍ॅप उपलब्ध करून द्यायचे असेल तर कंपनीला २५ डॉलर्स भरावे लागतात. तर अ‍ॅप स्टोअरसाठी ही रक्कम सरासरी १०० डॉलर्स इतकी आहे. यामुळे अ‍ॅप बाजारात व्यावसायिक अ‍ॅप्ससोबतच, विद्यार्थ्यांनी विकसित केलेले अ‍ॅप, काहींनी छंद म्हणून केलेले अ‍ॅप्स, तात्कालिक अ‍ॅप्स अशा अ‍ॅप्सचाही समावेश असतो आणि अ‍ॅप्सची संख्या फुगलेली दिसते, असे निरीक्षण मोबीएसओ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नितीन वळामे यांनी स्पष्ट केले. याचबरोबर बाजारात अ‍ॅप येण्याचे प्रमाण कमी होणार नाही. मात्र जे अ‍ॅप विपणन करण्यात कमी पडतील अशा अ‍ॅप्सना कमी डाऊनलोड्स मिळतील असेही वळामे यांनी स्पष्ट केले.

अ‍ॅप बाजारातील महत्त्वाची निरीक्षणे

  • गुगल प्ले या अ‍ॅप बाजारात सर्वाधिक एक लाख ८० हजार २४७ अ‍ॅप्स शैक्षणिक विषयाशी संबंधित आहेत.
  • अ‍ॅपला जाहिराती मिळवण्यासाठी किमान दहा हजार डाऊनलोड्स अपेक्षित असतात.
  • गुगल प्ले या अ‍ॅपबाजारात १४ जुलैच्या आकडेवारीनुसार २२ लाख ७० हजार ६०५ अ‍ॅप्स उपलब्ध होते.