१८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याबाबतचा निर्णय आज, बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. मात्र राज्यात लशींचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्याशिवाय या वयोगटांतील नागरिकांना १ मेपासून लस देणे शक्य होणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. त्यामुळे महाराष्ट्र दिनापासून राज्यात या वयोगटाचे लसीकरण सुरू होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जाते.

१८-४४ वयोगटांच्या मोफत लसीकरणाबाबतच्या प्रस्तावाला अर्थखात्याने मान्यता दिली आहे. त्यासाठी अर्थखात्याने साडेसहा हजार कोटींची तरतूद केली आहे. यासंदर्भात बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

राज्यात १८ ते ४४ वयोगटांतील सुमारे ५ कोटी ७१ लाख नागरिक आहेत. या नागरिकांना लशीच्या दोन मात्रा देण्यासाठी १२ कोटींहून अधिक लशींची गरज असून, लसपुरवठ्याबाबत राज्य सरकारने सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांकडे विचारणा केली आहे. तसेच या दोन कंपन्यांकडून पुरेशी लस मिळाली नाही तर जागतिक निविदेच्या माध्यमातून परदेशातून लस खरेदी करण्याचीही राज्य सरकारची भूमिका आहे. त्यासाठी सुमारे साडेसहा हजार कोटी रुपये खर्चून पुढील सहा महिन्यांत लोकांचे लसीकरण करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या परवानगीने परदेशातून लस आयात केली जाईल. लसीकरणची मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी सचिवांची उच्चाधिकार समिती नेमण्यात आली असून परदेशातून लस खरेदीबाबतही मंत्रिमंडळाच्या बैठकीत उच्चाधिकार समितीला स्पष्ट सूचना दिल्या जातील, असेही पवार यांनी सांगितले.

केंद्र सरकारने १ मेपासून १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र त्यासाठी आवश्यक लशींची खरेदी करण्याची जबाबदारी पूर्णत: राज्य सरकारची आहे, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसखरेदीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. सीरम आणि भारत बायोटेक या दोन्ही उत्पादक कंपन्यांना प्रस्ताव पाठवले आहेत.

लसीकरणात सरकारच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक भार लक्षात घेता सरसकट सर्र्वांनाच लस मोफत द्यायची की समाजातील दुर्बल घटकांनाच याबाबत निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल, असेही टोपे यांनी सांगितले. १८ ते ४४ वयोगटांतील लसीकरण केवळ ‘कोविन’ संकेतस्थळावर नोंदणी करून दिलेल्या वेळेनुसारच केले जाणार आहे. त्यामुळे १ मे रोजी लसीकरण केंद्रावर लोकांनी गर्दी करू नये, असे आवाहन टोपे यांनी केले.

राज्यात दीड कोटी नागरिकांना लस

मुंबई : करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात मंगळवारी महाराष्ट्राने उच्चांक नोंदवला. राज्याने आतापर्यंत दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले. दररोज ८ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट राज्याने ठेवले असून त्यासाठी लशींचा पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

निर्बंध लांबणार?

मुंबई : करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात सध्या लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमध्ये आणखी एक ते दोन आठवडे वाढ केली जाण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत याबाबत आढावा घेतला जाईल. राज्यात ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू करण्यात आले असून, त्याची मुदत शुक्र वारी संपत असल्याने येत्या दोन दिवसांत सरकारला नवा आदेश काढावा लागणार आहे.