रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजपशी युती केली असली तरी त्यांचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या आश्रयाला जाऊ लागले आहेत. आरपीआयच्या काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीच्याच पुढाकाराने गेल्या सात-आठ महिन्यात आरपीआयध्ये तिसरी फूट पाडण्यात आली. आरपीआयसाठी हा मोठा धक्का आहे.
रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआयने दहा वर्षे कॉंग्रेसबरोबर व दहा वर्षे राष्ट्रवादीबरोबर राहून सत्तेचे राजकारण केले. मागील लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याचा राग येऊन त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली व थेट शिवसेना-भाजपच्या गोटात प्रवेश केला. आठवले यांचे शिवसेना-भाजपबरोबर जाणे मात्र अनेक कार्यकर्त्यांना आवडले नाही. त्यातच मुंबई महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवाने तर खचलेल्या काही कार्यकर्त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचीच तयारी केली. त्यानुसार मागील वर्षी मे महिन्यात माजी नगरसेवक प्रकाश भोसले यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत सहभागी झाले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात चिंतामण गांगुर्डे, श्रीधर साळवे या आघाडीच्या कार्यकत्यांनी राष्ट्रवादीचीच वाट धरली. नागपूरमधील आरपीआयचे नगरसेवक प्रकाश गजभिये यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच त्यांची मागासवर्गीय सेलच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली. त्यानंतर गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, उपाध्यक्ष विजय कांबळे, प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांच्या उपस्थितीत मुंबईतील आरपीआयचे आघाडीचे कार्यकर्ते प्रल्हाद खंदारे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
आरपीआयमधून असे अनेक धडाडीचे कार्यकर्ते बाहेर पडू लागल्याने आठवले यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.