जातपडताळणीत प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पालिका सभागृहाने तीन नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द केले. यात भाजपच्या मुरजी पटेल आणि केशरबेन पटेल या दाम्पत्याचा समावेश असल्याने भाजपच्या संख्याबळात घट झाली आहे. तर काँग्रेसच्या एका नगरसेवकाचेही पद रद्द करण्यात आले.

पालिकेच्या २०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी तीन नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले होते. प्रभाग क्रमांक २८ मधील काँग्रेसचे राजपती यादव, प्रभाग क्रमांक ७६ मधील भाजपच्या नगरसेविका केशरबेन पटेल आणि प्रभाग क्रमांक ८१ मधील नगरसेवक मुरजी पटेल यांचे नगरसेवकपद धोक्यात आल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने जातपडताळणी समितीचा निर्णय कायम ठेवत प्रमाणपत्र अवैधच असल्याचा निर्णय दिला. या पार्श्वभूमीवर महापौरांनी बुधवारी पालिका सभागृहात याबाबतची अधिकृत घोषणा केली.

पालिकेत भाजपचे ८३ सदस्य आहेत. एक अपक्ष उमेदवार आणि अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांनी पाठिंबा दिल्यामुळे भाजपचे संख्याबळ ८५ आहे. मात्र पटेल दाम्पत्याचे नगरसेवकपद रद्द झाल्यामुळे भाजपचे संख्याबळ आता ८३ झाले आहे. नगरसेवकपद रद्द झालेल्या प्रभागांमध्ये दुसऱ्या क्रमांकावरील मते मिळवणाऱ्या उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेला दोन तर काँग्रेसला एक जागा मिळू शकणार आहे. दरम्यान, शिवसेनेच्या सगुण नाईक यांचेही पद रद्द झाले आहे. पालिकेत शिवसेनेचे ८५ नगरसेवक असून ३ अपक्षांचा पाठिंबा अधिक मनसेतून आलेले ६ नगरसेवक असे ९४ इतके संख्याबळ शिवसेनेचे होते. आता त्यात एकची घट झाली आहे.

आताचे संख्याबळ

* शिवसेना – ९३ (तीन अपक्षांचा पाठिंबा)

* भाजप – ८३ (दोन अपक्षांचा पाठिंबा)

* काँग्रेस – ३०

* राष्ट्रवादी – ९

* मनसे – १

* समाजवादी – ६

* एमआयएम – २