‘सामना’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बन्याबापू’ अशा मराठी चित्रपटांमधून काम केलेल्या ज्येष्ठ चरित्र अभिनेत्री आशा पाटील यांचे सोमवारी रात्री कोल्हापूर येथे निधन झाले. ऐंशी वर्षांच्या आशा पाटील यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
१९६० साली ‘अंतरीचा दिवा’ या माधव शिंदे दिग्दर्शित चित्रपटामधून त्यांनी साहाय्यक अभिनेत्री म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्या चित्रपटानंतर ‘माणसाला पंख असतात’, ‘शाहीर परशुराम’, ‘प्रीतीविवाह’, ‘रंगल्या रात्री अशा’, ‘निवृत्ती ज्ञानदेव’, ‘कामापुरता मामा’ असे एकापाठोपाठ एक चित्रपट त्यांना मिळत गेले. मध्यंतरीच्या काळात त्यांनी नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकातही काम केले.
दादा कोंडकें च्या चित्रपटांमधून त्यांच्या आईच्या भूमिकेत आशा पाटील यांनी काम केले होते. भालजी पेंढारकरांच्या ‘साधी माणसं’ चित्रपटातही त्यांनी काम केले होते. ‘मंत्र्यांची सून’, ‘आयत्या बिळावर’, ‘गावरान गंगू’, ‘उतावळा नवरा’, ‘शुभ बोल नाऱ्या’, ‘माहेरची साडी’ ते ‘ह्य़दयस्पर्शी’, ‘घे भरारी’ अशा असंख्य चित्रपटांमधून त्यांनी काम केले होते.