खिशात रोकड नसली तरी बँकखात्यात मात्र हक्काचा पैसा साठवलेला आहे. याचबरोबर इतके दिवस घरात साठवलेली रक्कमही निश्चलनीकरणानंतर बँकेत जमा केली असेलच. या पैशांचे करायचे काय? ते कुठे गुंतवायचे? कोणत्या योजनेत गुंतवले की जास्त परतावा मिळेल? योग्य गुंतवणूक करायची असेल तर ‘वेल्थट्रस्ट’ नावाची एक तंत्रस्नेही व्यवस्था निसर्ग गांधी व जास्मिन गोएल या दोन तरुणांनी उभी केली आहे. या व्यवस्थेद्वारे गुंतवणुकीसंदर्भात योग्य मार्गदर्शन मिळू शकते.

अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर निसर्ग गांधी याला इस्रोमध्ये काम करण्याची संधी मिळाली. याचबरोबर महाविद्यालयातील त्याचा मित्र जास्मिन गोएल यालाही आयटी क्षेत्रात नोकरी मिळाली. पण या दोघांनाही त्यांच्या मनातील स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. यामुळे निसर्गने इस्रोमध्ये काम करत असताना आयआयटी मुंबईतून व्यवस्थापनाची पदवी घेतली. यानंतर त्याने ती नोकरी सोडून एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी स्वीकारली. स्वत:च्या व्यवसायाविषयी त्याची आणि जास्मिनची सातत्याने चर्चा व्हायची. डिसेंबर २०१४मध्ये दोघांनीही आता व्यवसाय करण्याची योग्य वेळ आहे असे ठरविले आणि कामास सुरुवात केली. नेमके काय करायचे हे अद्याप डोळ्यासमोर नव्हते. दोघेही नोकरीत असल्यापसून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत होते. त्यात त्याचा गाढा अभ्यासही झाला होता. निसर्गने व्यवस्थापन शिक्षण घेतल्यामुळे त्यालाही या क्षेत्रात गती आली होती. एके दिवशी निसर्गने आपण नोकरी सोडल्यावर पुढील सहा महिने जगण्यासाठी आपल्याकडे किती पैसे आहेत याचा विचार करण्यास सुरुवात केली. यासाठी त्याने त्याच्याकडील गुंतवणुकीची कागदपत्रे काढली व एका एक्सेल फाइलमध्ये सर्व माहिती लिहून काढली. ही एक्सेलमधील माहिती मोबाइलमध्ये लिहता येईल का असा विचार त्याच्या मनात आला आणि तो त्याचे जास्मिनला बोलून दाखविला. यावर जास्मिनने काम सुरू केले व त्या दोघांनी खर्चाचे नियोजन करणारे अ‍ॅप विकसित केले. या अ‍ॅपवर त्यांनी काही दिवस काम केले. पण तितकेच करून पुरेसे नव्हते. त्याच्यापुढे जाऊन काही तरी करणे आवश्यक होते. तेव्हा गुंतवणूक क्षेत्रातील ज्ञानाचा फायदा घेऊन कोणतेही कमिशन न घेणारे अ‍ॅप विकसित करावे असे त्यांना वाटले आणि त्यातून ‘वेल्थट्रस्ट’चा जन्म झाला.

हे अ‍ॅप गुगल प्लेवर उपलब्ध असून ते डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये आपण आपली सर्व माहिती उपलब्ध करुन द्यायची आहे. आत्तापर्यंतची गुंतवणूक काय आहे ते कोणत्या योजनांमध्ये ते गुंतवले आहे याचा तपशील द्यावा लागतो. हा तपशील दिल्यावर ई-मेलद्वारे आपल्याला आपल्या गुंतवणुकीची एकत्रित माहिती पाठविली जाते. या कंपनीने कोणतेही कमिशन न घेता काम करायचे ठरविल्यामुळे ग्राहकांच्या खर्चात एक ते दीड टक्क्यांची बचत होते यामुळे ग्राहकांना कमी पैशांत जास्त परतावा मिळू शकतो असे निसर्गने नमूद केले. यात तुम्ही यापूर्वी कमिशन देऊन घेतलेल्या योजनाही कमिशनशिवायच्या योजनांमध्ये परावर्तित करण्याची सुविधा आहे. यामुळे भविष्यात या योजनेसाठी येणारा तुमचा हप्ता कमी होण्यास मदत होणार आहे. या अ‍ॅपमध्ये ग्राहकांना रोज त्यांच्या गुंतवणुकीचे किती मूल्यांकन झाले आहे याबाबत तपशील दिला जातो. तसेच ते त्यांची गुंतवणूक एका क्लिकवर पाहू शकतात. तसेच एका क्लिकवर नवी गुंतवणूकही करू शकतात.

भविष्यातील वाटचाल

सध्या हे अ‍ॅप केवळ अँड्रॉइडवरच उपलब्ध असून भविष्यात ते आयओएसवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचबरोबर गुंतवणुकीसाठी वैयक्तिक सल्ला देण्याची सुविधा सुरू करण्याचाही मानस असल्याचे निसर्गने स्पष्ट केले.

नवउद्यमींना सल्ला

जेव्हा तुम्ही व्यवसाय करायचा निर्णय घेता तेव्हा आपण कोणता व्यवसाय करणार आहोत त्याची छोटी प्रतिकृती बनवा. जेणेकरून आपण जे काही करणार आहोत त्याचा अंदाज बांधणे तुम्हाला शक्य होणार आहे. याचा फायदा गुंतवणूक मिळवण्यासाठी गुंतवणूकदाराला भेटतानाही होतो असेही निसर्गने नमूद केले.

गुंतवणूक व उत्पन्नस्रोत

हा व्यवसाय उभारण्यासाठी सुरुवातीच्या काळात त्यांनी स्वत:चे पैसे गुंतवले. मात्र २०१६मध्ये त्यांना गुंतवणूकदार मिळाले असून त्यांनी व्यवसायात आवश्यक ती गुंतवणूक केल्याचे निसर्गने नमूद केले. हे अ‍ॅप सुरुवातीचे सहा महिने मोफत देण्यात येणार आहे. यानंतर अ‍ॅपचा वापर करायचा असेल तर त्यासाठी विविध पॅकेजनुसार पैसे आकारले जाणार आहेत. यातून येणारा निधी हेच आमचे मुख्य उत्पन्नस्रोत असल्याचे निसर्गने नमूद केले.

नीरज पंडित – niraj.pandit@expressindia.com