मुंबई : अभिनेते-दिग्दर्शक अतुल काळे यांच्या ‘बाळकडू’ या मराठी चित्रपटातून ज्येष्ठ अभिनेते टिकू तलसानिया यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर तब्बल ८ वर्षांनंतर पुन्हा एकदा टिकू तलसानिया मराठी चित्रपटात पुनरागमन करीत आहेत. हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून ८०च्या दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे टिकू तलसानिया ‘झोलमॉल’ या आगामी मराठी चित्रपटात आगळीवेगळी भूमिका साकारत आहेत. ‘झोलमॉल’ चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुबेर करत असून, नागपूरमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज कुबेर यांचा फोन आला आणि त्यांनी एक मराठी चित्रपट करणार का, अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांनी भेटून मला चित्रपटाची कथा सांगितली आणि लगेचच चित्रपटासाठी होकार दिल्याचे टिकू यांनी सांगितले.

हेही वाचा – मुंबई : गिरणी कामगार, वारसांना घराच्या अर्जातील दुरुस्तीसाठी मुदतवाढ; १७ फेब्रुवारीपर्यंत दुरुस्ती करता येणार

टिकू तलसानिया यांना आपण अनेक हिंदी मालिका, चित्रपटांतून पाहिले आहे. विनोदाचे अचुक टायमिंग असलेले अभिनेते म्हणून टिकू तलसानिया यांची खास ओळख आहे. १९८६ साली राजीव मेहरा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘प्यार के दो पल’ या चित्रपटातून टिकू तलसानिया यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मात्र, त्यांनी गुजराती रंगभूमीवरून अभिनयाला सुरुवात केली होती. त्यानंतर डी.डी नॅशनल वाहिनीवर १९८४ साली प्रदर्शित झालेल्या ‘ये जो है जिंदगी’ या मालिकेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. याव्यतिरिक्त ‘सजन रे झुठ मत बोलो’, ‘हम बस बाराती’, ‘जमाना बदल गया’ या मालिकांमध्येही त्यांनी काम केले. ‘अंदाज अपना अपना’, ‘कुली नं-१’, ‘तराजू’, ‘हिरो नं-१’, ‘देवदास’, ‘सर्कस’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा – मुंबई : लोकल प्रवासात ‘भारतीय संविधाना’चे स्मरण, मध्य रेल्वेचा नवा उपक्रम

‘झोलमॉल’ या चित्रपटात टिकू तलसानिया यांच्यासोबत अभिनेते भरत जाधव, मंगेश देसाई, भारत गणेशपुरे अभिनेत्री प्रार्थना बेहरे, हेमांगी कवी, स्मिता गोंदकर, अश्विनी कुलकर्णी अशी दमदार कलाकारांची फौज या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार आहे. नागपूरच्या पद्मा फिल्म्स प्रॉडक्शनची पहिलीच निर्मिती असून हरीषकुमार बाली हे या चित्रपटाचे निर्माते, तर दिग्दर्शनाची धुरा राज कुबेर यांनी सांभाळली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor tiku talsania comeback in marathi film jholmall movie mumbai print news ssb
First published on: 27-01-2023 at 14:57 IST