लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न निरीक्षकांनी कारवाई केल्यानंतर भेसळयुक्त खाद्यपदार्थाचा अहवाल १४ दिवसांत मिळाल्यास संबंधित व्यावसायिकावर कारवाई करणे शक्य होते. मात्र अन्न व औषध प्रशासनाच्या पारंपरिक प्रयोगशाळेमुळे अहवाल वेळेत मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने मुंबई येथे अद्ययावत सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळा उभारली आहे. यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे.

राज्यातील नागरिकांना सकस, निर्भेळ व उत्कृष्ट खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून वारंवार खाद्यपदार्थ विक्रेत, उपहारगृहांची तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये संशयास्पद आस्थापनावार कारवाई करण्यात येते. या आस्थापनातून जप्त केलेले नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येतात. मात्र अनेक वेळा त्याचा अहवाल १४ दिवसांमध्ये मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाला कारवाई करण्यात अडचणी येतात. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणच्या अन्न चाचणी प्रणालीचे बळकटीकरण करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण व अन्न व औषध प्रशासनातील सामंजस्य करार करण्यात आला असून त्यातूनच मुंबईमध्ये अद्ययावत सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.

आणखी वाचा-मुंबईतील तापमानाचा पारा आज, उद्या ३७ अंशावर

या प्रयोगशाळामध्ये नमून्यांचे तर्कशुद्ध पद्धतीने विश्लेषण करण्यासाठी सरकारी- खासगी भागीदारी तत्वावर तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच या प्रयोगशाळेत कर्मचारी व अन्य सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. नव्या प्रयोगशाळेत रासायनिक विश्लेषणाबरोबरच अन्न चाचणी करण्यासाठी एनएबीएलची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता कोणत्याही खाद्यपदार्थाचे सूक्ष्म विश्लेषण करणे अन्न व औषध प्रशासनाला शक्य होणार आहे. अद्ययावत प्रयोगशाळेमुळे विश्लेषण वेगाने होण्यास मदत होणार असल्याने त्यांचा अहवाल १४ दिवसांमध्ये मिळणे शक्य होणार आहे. अहवाल १४ दिवसांच्या आता मिळाल्याने संबंधित आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करणे सोपे होईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दिली.

राज्यात पाच ठिकाणी उभारणार प्रयोगशाळा

राज्यामध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या तीन प्रयोशाळा आहेत. यामध्ये मुंबई व पुण्याचा समावेश आहे. मात्र कारवाईअंतर्गत जप्त केलेल्या नमून्यांचे वेगवान विश्लेषण व्हावे यासाठी आता राज्यामध्ये आणखी पाच ठिकाणी अद्ययावत प्रयोगशाळा उभाण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.