लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मागील काही दिवस कमाल आणि किमान तापमानात वाढ होत असून पहाटे गारवा त्यानंतर दिवसभर उकाडा अशा वातावरणाचा मुंबईकरांना सामना करावा लागत आहे. मुंबईमध्ये बुधवारी आणि गुरुवारी तापमान ३७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मुंबई शहर तसेच उपनगरांत सध्या पहाटे गारवा जाणवत असून त्यानंतर दिवसभर उकाडा सोसावा लागत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर असणारे उन्हाच्या काहीलीने त्रस्त होत आहेत. दरम्यान, मुंबईत सोमवारी हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात ३७.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती त्यानंतर आता पुन्हा दोन दिवस पारा ३७ अंशावर जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यंदा हंगामातील सर्वाधिक कमाल तापमान हे सोमवारी नोंदवले गेले आहे.

आणखी वाचा-मुंबई : काही निकाल अद्यापही रखडलेले, पदव्युत्तर विधि शाखेच्या विद्यार्थ्यांना मनःस्ताप

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे बुधवारी आणि गुरुवारी कमाल तापमानाचा पारा वाढणार आहे . तसेच देशात पश्चिमी प्रकोपाची प्रणाली निर्माण होत असल्याने वाऱ्यांची दिशा बदलते. त्यानंतर पश्चिमी प्रकोप प्रणाली निर्माण झाल्यावर पुन्हा उत्तरेकडून वारे वाहायला लागल्यावर तापमानात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.