कोणत्याही शिल्पाच्या उंचीपेक्षा शिल्पाचं कला मूल्य जपणं महत्त्वाचं असतं असं मत ज्येष्ठ शिल्पकार अरूणाताई गर्गे यांनी व्यक्त केलं. सध्या मोठी स्मारकं उभी करण्याची जणू स्पर्धा सुरु झाली आहे, ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’चं उदाहरण देऊन त्यापेक्षा उंच स्मारकं उभारली जातात. मात्र त्यामध्ये कला मूल्य आहे का? हे पाहिलं जात नाही. एखाद्या शिल्पाचा आकार मोठा असण्यापेक्षा त्या शिल्पकलेचं मूल्य किती आहे हे पहाणं जास्त महत्त्वाचं आहे असंही त्या म्हणाल्या. शासन, अशी शिल्प उभारणारे कलाकार आणि जनता काहीही करणार नाही का? असाही प्रश्न त्यांनी विचारला. तसंच भारतीय कलेचा शिक्षणात समावेश करण्यासंदर्भातही गंभीर विचार व्हावा असंही मत अरूणा गर्गे यांनी व्यक्त केलं.
मुंबईतील जहांगीर कला दालनात नाशिक येथील ज्येष्ठ शिल्पकार अरूणा गर्गे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी व्यक्त करण्यात आलेल्या मनोगतात त्यांनी कलेचं मूल्य जपलं गेलं पाहिजे हे मत व्यक्त केलं. ‘द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ला 101 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यात जीवन गौरव पुरस्कार देऊन अरूणाताई गर्गे यांचा सन्मान करण्यात आला. नव्या कलाकारांमध्येही आपल्यासारखीच उर्मी पाहण्यास मिळते याचा आनंद वाटत असल्याचंही अरूणा गर्गे या सोहळ्यात म्हटल्या. तसेच कोणत्याही पुरस्कारासाठी मी काम केलं नाही. हा पुरस्कार मिळाला ही पाठीवरची थाप आहे असंही त्या म्हणाल्या. डॉ. फिरोजा गोदरेज यांच्या हस्ते पुरस्कार देऊन अरूणा गर्गे यांचा गौरव करण्यात आला.
नंदकिशोर राठी हेदेखील या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबईतील जहांगीर कलादालन या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा पार पडला. आर्ट सोसायटी ऑफ इंडियाला 101 वर्षे पूर्ण झाली. ही संस्था कलाकारांसाठी काम करते आहे याचा निश्चितच आनंद वाटतो असंही त्या म्हटल्या. स्वनिर्मितीचा आनंद वेगळा असतो ते शोधणारे खूप कलाकार आहेत, ते पाहून समाधान वाटतं असंही अरूणाताई म्हणाल्या. या पुरस्कार सोहळ्याच्या आधी शिल्पकार अरूणा गर्गे यांच्या शिल्पकृतींवर आधारित एक व्हिडिओ क्लिपही सादर करण्यात आली.