एकाएकी बँक खात्यातून ३६ हजार रुपये काढल्याचे लक्षात आल्यावर ती महिला घाबरली. एटीएम कार्ड आपल्याचकडे असूनही कोण पसे काढतंय, असा विचार करून त्या बुचकळ्यात पडल्या. भ्रमणध्वनीवर आलेल्या संदेशात हे पसे कुल्र्यातून काढल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी तातडीने कुल्र्याच्या विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात त्याची तक्रार दिली. महिनाभर पोलीस या तक्रारीचा शोध घेत होते, परंतु, काही सुगावा लागत नव्हता. पण, पोलिसांची चौकसबुद्धी जिवंत असेल तर एका छोटय़ाशा गोष्टीवरूनही गुन्ह्य़ाची उकल करतो. महिन्याभराच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय टोळक्याला पकडले.
वांद्रे येथे राहणाऱ्या कॅन्डीस फर्नाडिस या मध्यमवर्गीय गृहिणी. घरखर्चातून पसे वाचवून ते गाठीशी बांधणाऱ्या कॅन्डीस यांना १५ सप्टेंबर, २०१५ रोजी धक्काच बसला. त्यांच्या खात्यातून ३६ हजार ५०० रुपये काढल्याचे एकापाठोपाठ चार लघुसंदेश आले. मेसेज पाहून कॅन्डीस चक्रावल्या. त्यांनी लगेच एटीएम कार्डचा शोध घेतला. कार्ड त्यांच्याकडेच होते. मग कुल्र्यातून पसे कुणी काढले, हा विचार त्यांना स्वस्थ बसू देईना. लघुसंदेश नीट वाचला तेव्हा हे पसे कुर्ला पश्चिम येथील एका एटीएममधून काढण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. कॅन्डीस यांनी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात याची तक्रार दाखल केली.
विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी हा प्रकार एटीएम फसवणुकीचा आहे, हे ताडले. त्यांनी त्याचा तपास उपनिरीक्षक गणेश मोहिते यांच्याकडे सोपवला. उपनिरीक्षक मोहिते यांनी बँकेकडून त्यांच्या एटीएममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे चित्रीकरण मागवले. ज्या वेळी कॅन्डीस यांना पसे काढल्याचा संदेश आला त्या वेळी कुल्र्यातील त्या एटीएममध्ये एक टोपी घातलेली व्यक्ती पसे काढत असल्याची दिसून आली. तपास करत असलेल्या पथकाने या व्यक्तीनेच पसे काढल्याचा निष्कर्ष काढला. पण, चेहरा लपवत आलेल्या या व्यक्तीला दीड कोटींच्या मुंबईत कसे शोधायचे? पोलिसांनी पुन्हा कॅन्डीस यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यांचे कार्ड त्यांनी गेल्या काही दिवसांत कुणाला वापरायला दिले का, कोणकोणत्या रेस्टॉरन्ट-हॉटेलमध्ये ते वापरले, कुठे खरेदी केली, याची सखोल चौकशी पोलिसांनी केली. मात्र, काहीच सुगावा लागत नसल्याने पथकातील कर्मचारीही अस्वस्थ होऊ लागले होते. चौकशीदरम्यान कॅन्डीस यांनी गेल्या काही दिवसांत कोणकोणत्या एटीएममधून पसे काढले याची माहितीही दिली. एटीएमची माहिती चोरीला जाण्यासाठी कुणी तरी ते कार्ड हाताळले असण्याची किंवा कुठल्या तरी असुरक्षित ठिकाणी ते वापरले असलेच पाहिजे. त्यामुळे कॅन्डीस यांनी सांगितलेल्या ठिकाणी जाऊन शोध घेण्याचे विनोबा भावे नगर पोलिसांनी ठरवले. इतक्या बारकाईने तपास करण्यास किती दिवस लागतील याची काहीच शाश्वती नव्हती. पण जर सर्वसामान्यांची कमाई अशी बेधडकपणे कोणी लुटत असेल तर त्याला बेडय़ा ठोकणे आवश्यक होते.
कॅन्डीस यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी वापरलेल्या एटीएमची तपासणी करत त्यांच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. वांद्रे हिल रोड येथील एका बँकेचे एटीएम पोलिसांनी पाहिल्यानंतर कुल्र्याप्रमाणेच या एटीएमलाही सुरक्षारक्षक नसल्याची बाब लक्षात आली. पोलिसांनी एका बाजूला एटीएमवर पाळत ठेवण्याबरोबरच त्याचे सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचे सत्र चालवले होते. पोलिसांच्या प्रयत्नाला यश आले. वांद्रे हिल रोड येथील ज्या एटीएममधून कॅन्डीस यांनी पसे काढले. त्याच्या काही वेळ आधी एटीएममध्ये एक नायजेरियन युवक स्कीमर लावत असल्याचे त्यांना दिसून आले. १३ सप्टेंबर, २०१५च्या त्या संध्याकाळी टोपी घातलेला त्या नायजेरियन इसमाची शरीरयष्टी कुल्र्यातील एटीएममधून पसे काढणाऱ्या व्यक्तीशी मिळतीजुळती होती. त्या संध्याकाळी या व्यक्तीने १५ मिनिटांच्या अंतराने तिथून पसे काढल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. अत्यंत सफाईदारपणे कुठलेही अवघडलेपणा न बाळगता एका सराईत गुन्हेगाराप्रमाणे ही व्यक्ती काम करत असल्याचे पोलिसांनी हेरले. पण, टोपीमुळे पोलिसांना चेहरेपट्टी दिसत नव्हती. उपनिरीक्षक मोहिते यांनी मात्र एक गोष्ट ताडली. १५ मिनिटांनंतर जेव्हा ती व्यक्ती एटीएममध्ये आली, तेव्हा एका आंतरराष्ट्रीय कंपनीची पिशवी त्याच्या हातात होती. पोलीस पथकाने तातडीने त्या एटीएमच्या आसपास त्या कंपनीची उत्पादने कुठे मिळतात याचा शोध घेतला. कंपनीचे अधिकृत शोरूम अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असलेले पोलिसांनी शोधले. दुकानातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यावर तिथेही पोलिसांच्या पदरी निराशा आली, कारण, त्या दुकानातही ही व्यक्ती टोपी घालून फिरत होती. पोलिसांनी शोरूमच्या बिलिंग काऊंटरवर चौकशी केली तेव्हा ती व्यक्ती कंपनीची नियमित ग्राहक असून त्याचा एक भ्रमणध्वनी क्रमांक तिथे नोंदलेला असल्याचे कळाले. क्रमांकाचा माग काढला असता, तो बंद असला तरी त्याचे ठिकाण वांद्रे परिसरातच सतत असल्याचे कळून चुकले. मग पथकाने वांद्रे परिसरात राहणाऱ्या नायजेरियनचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही संशयित पोलिसांना कळाले. वांद्रय़ाच्या पाली नाका येथील फातिमा हाऊसमध्ये ती टोपी घातलेली व्यक्ती आणखी दोन जणांसह राहत असल्याचे स्पष्ट झाले. रविवारी ४ ऑक्टोबरच्या रात्री विनोबा भावे नगर पोलिसांनी छापा मारत, तीन जणांना अटक केले. छापा मारला तेव्हा घरात ४९७ बनावट एटीएम कार्ड, २८ लाख ५४ हजार रुपयांची रोकड, एक लाख ४२ हजार रुपये किमतीचे मोबाइल्स, स्किमर, स्पाय कॅमेरा सापडले. चौकशीत या त्रिकुटाने रोमानियासह इंग्लंड, इटली, चिली आणि काही युरोपियन देशांमध्येही अशा प्रकारे गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले. मुंबईत टूरिस्ट व्हिसावर असलेल्या आरोपींनी मुंबईत असे अनेक गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले. कुठलाही पुरावा मागे न ठेवणाऱ्या या टोळक्याने जगभरात अनेक ठिकाणी गुन्हे करून पसे कमावले, मात्र मुंबई पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे त्यांच्या हातात बेडय़ा पडल्याच.

अनुराग कांबळे