लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्गाला वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी अवजड असा पहिली तुळई (गर्डर) समुद्रात आणण्यात येणार आहे. सध्या आठवडाभर समुद्रात मोठी भरती असल्यामुळे तुळई आणण्याचे काम लांबणीवर पडले आहे. येत्या शुक्रवारी पहिली तुळई वरळी येथे समुद्रमार्गे आणण्यात येणार असून ती स्थापन करण्याचे काम या आठवड्याअखेरीस केले जाणार आहे. मुंबई महापालिकेने आतापर्यंत रेल्वे रुळांवर तुळई स्थापन करून पूल बांधले आहेत मात्र समुद्रात तुळई स्थापन करून पूल तयार करण्याचा हा पहिलाच प्रयत्न मुंबई महापालिका करणार आहे.

प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत पालिके चा महत्त्वाकांक्षी सागरी किनारा प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प असे नाव या प्रकल्पाला देण्यात आले असून या प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राईव्हपर्यंतची मार्गिका नुकतीच सुरू झाली आहे. हा मार्ग वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकाला जोडण्यासाठी वरळीच्या समुद्रात पूल बांधण्यात येणार आहेत. या पूलाच्या दोन खांबामधील अंतर वाढवून मिळावे यासाठी वरळीतील मच्छिमारांनी समुद्रातील काम अनेक महिने थांबवल्यामुळे सागरी सेतू सी लिंकला जोडण्याचे काम रखडले होते. त्यामुळे सध्या केवळ वरळीपासूनचा मार्ग सुरू करण्यात आला आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानंतर या वरळीतील पुलाच्या दोन खांबांमधील अंतराचा मुद्दा मिटला होता व पूल तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार आता या पूलासाठीचे तयार तुळया वरळीत आणण्यात येणार आहेत.

आणखी वाचा-आमचा प्रश्न : वायव्य मुंबई – जोगेश्वरी गुंफेचे सुशोभीकरण कधी प्रकल्पबाधितही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

अवाढव्य गर्डर

नवी मुंबईतील न्हावा बंदरात सागरी किनारा मार्गासाठी लागणाऱ्या दोन तुळयांपैकी एक तुळई तयार झाला असून ती वरळीत समुद्रमार्गे आणण्यात येणार आहे. त्याचे वजन १७०० टन असून १३६ मीटर लांब व ३६ मीटर उंची आहे. समुद्राच्या भरती ओहोटीचा अंदाज घेऊन तुळई आणली जाणार आहे. त्यानंतर या आठवडा अखेरीस तुळई बसवण्याचे काम केले जाणार आहे. त्यानंतर या मार्गाच्या दुसऱ्या बाजूची तुळई आणून ती बसवली जाणार आहे. दोन्ही तुळया बसवल्यानंतर सागरी किनारा मार्ग आणि सी लिंक यांना जोडण्याचे काम मे २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे. त्यानंतरच सागरी किनारा मार्ग पूर्णपणे सुरु होऊ शकणार आहे.

जॅकने उचलून तुळईची स्थापन

रेल्वे रुळांवर तुळई बसवताना ती रुळांवरून हळूहळू सरकवत पुढे पुढे नेण्याचा प्रयोग अंधेरीतील गोखले पूलाच्यावेळी करण्यात आला होता. मात्र समुद्रातील तुळई बसवण्याचा हा मुंबई महापालिकेचा पहिलाच प्रयत्न असून जॅकने उचलून तुळई स्थापन केली जाणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bridge in sea to connect bandra worli sea bridge and sea coast road mumbai print news mrj