पाली मैदान ते आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यानचे भुयारीकरण

‘कुलाबा-वांद्रे-सिप्झ’ या ‘मेट्रो-३’च्या भुयारी मार्गिकेचे मरोळच्या पाली मैदान ते आंतराष्ट्रीय विमानतळ दरम्यानचे भुयारीकरण पूर्ण झाले असून या कामात महत्त्वाची भूमिका बजावणारे ‘टनल बोअरिंग मशीन’ (‘टीबीएम’) हे अजस्र यंत्र पहिल्यांदाच बाहेर काढण्यात येणार आहे. मेट्रो-३च्या कामातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून हा क्षण २४ सप्टेंबर रोजी समारंभपूर्वक साजरा केला जाणार आहे.

सुमारे १.२६ किमीचे भुयारीकरण पूर्ण करून ‘‘टीबीएम’’ भुयारातून बाहेर पडणार आहे. मेट्रो -३चे पूर्ण झालेले हे सर्वात पहिले भुयार असेल. ‘मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’कडून (एमएमआरसी) सुरू असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वितेचे साक्षीदार खुद्द मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘टीबीएम’ यंत्र भुयारातून बाहेर काढले जाणार आहे.

मेट्रो-३ मार्गिकेच्या भुयारीकरणाला गेल्या वर्षी सुरुवात झाली. सर्वप्रथम माहीमच्या नयानगर येथील मोठय़ा विवरात (लॉन्जिंग शाफ्ट) कृष्णा १ आणि २ ‘टीबीएम’ यंत्रे उतरविण्यात आली होती. त्यापाठोपाठ यंदा जानेवारी महिन्यात मरोळ येथील पाली मैदानातील विवरात वैनगंगा १ आणि २ ‘टीबीएम’ उतरविण्यात आली. यामध्ये नयानगर येथून सोडलेल्या दोन्हीं ‘टीबीएम’ यंत्रांनी दादर (शिवसेना भवन) मेट्रो स्थानकाच्या दिशेने प्रत्येकी १ किमीच्या पुढे भुयारीकरण पूर्ण केले आहे. पाली मैदानातून विमानतळापर्यंतच्या १.२६ किमीचे भुयारीकरण पूर्ण करण्यासाठी दोन ‘टीबीएम’ यंत्रे सोडली होती. त्यापकी एक ‘टीबीएम’ यंत्र सोमवारी भुयारीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील विवरातून बाहेर पडणार आहे.

मेट्रोचे भुयारीकरण

* मेट्रो-३ चा प्रत्यक्ष मार्ग ३३.५ किमीचा असला तरी या प्रकल्पासाठी ५१ किमीचे भुयारीकरण केले जाणार आहे.

* भुयारीकरणासाठी १७ ‘टीबीएम’ यंत्रे मुंबईत दाखल झाली आहेत. तर त्यापैकी सुमारे ८ यंत्रे पूर्णत: कार्यान्वित झाली आहेत.

* ‘टीबीएम’ यंत्रे भूगर्भात उतरवून त्यांना कार्यान्वित करणाऱ्यासाठी सात ठिकाणी मोठी विवरे (लॉन्जिंग शाफ्ट) तयार करण्यात आली आहेत.

* एक ‘टीबीएम’ यंत्राद्वारे प्रति दिवस १० मीटर भुयारीकरण होते. माती आणि पाण्याच्या दबावामुळे दोन्ही यंत्रे समांतर गतीने भुयार खणत नाहीत. दबाव नियंत्रित करून भुयार खणण्याचे काम सुरू आहे.