नागपूर : उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील गटनेता मेळाव्यातील भाषण म्हणजे अरण्यरुदन होते, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे गुरुवारी केली. नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

मुंबईत बुधवारी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या टीकेकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘ठाकरेंचे भाषण म्हणजे निराशेचे अरण्यरुदन होते. माझा त्यांना सवाल आहे की आम्ही तर कायदेशीररीत्या निवडून आलो आहोत. मात्र, जेव्हा आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला, तेव्हा तुम्ही राजीनामे का नाही दिले? तेव्हा का नाही निवडणुका घेतल्या? तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत निवडून आले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र लावून आमच्यासोबत निवडून आले होते. हिंमत होती, तर त्या वेळी राजीनामे देऊन निवडून यायचे होते आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायचे होते.

ते मला संपवू शकणार नाहीत

देवेंद्र फडणवीसांची ही शेवटची निवडणूक ठरेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले, पण मी त्यांना एवढेच सांगतो, की ‘मुद्दई लाख चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर में होता है’. तुम्ही तिघांनी मिळून मला अडीच वर्षे संपवण्याचा प्रयत्न केला. पण संपवू शकला नाहीत. यापुढेही संपवू शकणार नाहीत, असेही फडणवीस म्हणाले.

उद्धव यांच्याकडून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली ;  शिंदे गटाचा आरोप

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळावा घेणार असून त्यात बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटता येणार आहे. यापूर्वी दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांचे विचार ऐकण्यासाठी लोक येत. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे आता ‘सोनियांचे विचार’ राहिले असून बाळासाहेबांच्या विचारांना त्यांनी तिलांजली दिल्याची टीका शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी गुरुवारी केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल गटप्रमुखांच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना पावसकर यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले.

उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात आता शिवसेनाप्रमुखांचे विचार राहिलेले नसून कोथळा, वार, घुसून मारणे असे काही सोडले तर त्यांच्याकडे बोलण्यासाठी आहे काय, असा प्रश्न त्यांनी केला.