* विकासदराचा दशकातील नीचांक
* रुपयाची लोळण
* शेअरबाजाराची घसरगुंडी
आर्थिक विकासदराने तिमाहीत नोंदविलेला दशकातील नीचांक, भारतीय चलन रुपयाची प्रत्येक अमेरिकी डॉलरमागे ५७ पर्यंत सुरू असलेली लोळण आणि याच्या एकत्रित परिणामाने शेअर बाजारात धरणीकंप झाल्यासारखी निर्देशांकांची वर्षांतील सर्वात मोठी घसरगुंडी अशी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंतेच्या छायेने शुक्रवारचा दिवस काळवंडला. उद्योगक्षेत्रातून आर्थिक वर्ष २०१३ मध्ये साधलेल्या अवघ्या ५ टक्के विकासदराबाबत टीकेचा स्पष्ट सूर दिसून आला, तर रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी महागाई वाढतच जाण्याच्या धोक्याचा पुनरूच्चार करीत व्याजदर कपातीला वाव नसल्याचे संकेत देऊन गुंतवणूकदारांमधील निराशेला आणखीच खतपाती घातले.
निर्मिती क्षेत्र, खाण उद्योग तसेच कृषी क्षेत्रातील विकासाच्या कासवगतीने देशाचा आर्थिक विकासदर सरलेल्या २०१२-१३ आर्थिक वर्षांत ५ टक्क्यांवर रोडावल्याचे आकडे शुक्रवारी सकाळी केंद्रीय सांख्यिकी संघटनेने जाहीर केले. आधीच्या वर्षांतील ६.२ टक्के आणि दोन वर्षांपूर्वीच्या ९.३ टक्क्यांच्या तुलनेत ही विलक्षण अधोगतीच नव्हे तर अर्थव्यवस्थेने गाठलेली दशकभरातील नीचांक पातळी असल्याने, देशाच्या उद्योगक्षेत्रातून विद्यमान सरकारच्या आर्थिक कारभाराबाबत टीका आणि निराशेची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. जानेवारी-मार्च २०१३ या तिमाहीतील विकासदर तर ४.८ टक्के असा नोंदविला गेला.
दुसरीकडे, भारतीय रुपयाही अमेरिकी डॉलरच्या तुलनेत शुक्रवारी १२ पैश्यांनी घसरून ११ महिन्याच्या निचांकी पातळीवर, ५६.५० रुपयांवर पोहोचला.  शुक्रवारच्या शेअर बाजारातील कुंद वातावरणात त्यांनी आणखीच भर घातली. सेन्सेक्सने दिवसअखेर ४५५.१० अंशांनी तर निफ्टीने १३८.१० अंशांनी म्हणजे प्रत्येकी सव्वादोन टक्क्यांनी घसरण दाखविली.