मुंबई : विसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांत धर्म-जातीचा राजकारणावरील पगडा वाढला आणि तेथून महाराष्ट्राने तर्कवादाची कास सोडली व बौद्धिक पीछेहाट सुरू झाली. महाराष्ट्राने तर्कवादाच्या आधारे देशाचे वैचारिक नेतृत्व के ले असल्याने तर्कवादाच्या पुनरुत्थानातच महाराष्ट्राचे व देशाचे हित आहे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी सोमवारी के ले.

महाराष्ट्र राज्याच्या ६१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘लोकसत्ता’ने ‘गाथा महाराष्ट्राची’ या वेब व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. त्यात ‘महाराष्ट्राचा तर्कवाद’ या विषयावर कुबेर बोलत होते. आध्यात्मिक अशा संत साहित्यातही तर्क वादाच्या आधारे समाजाला मार्ग दाखवणाऱ्या संत तुकाराम-संत रामदासांपासून ते इंग्रजी अमलाखालील महाराष्ट्राला आधुनिकतेकडे नेणारे बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, गोपाळ कृष्ण गोखले, रखमाबाई राऊत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विज्ञानवादी सावरकर ते नरहर कु रुंदकर अशा बुद्धिवंतांच्या योगदानाची माहिती देत कुबेर यांनी महाराष्ट्रातील बुद्धिवादाच्या-तर्कवादाच्या परंपरेचा पट उभा के ला. ‘भावभक्तीच्या देशा आणिक बुद्धिच्या देशा’ असे गोविंदाग्रज यांनी १०० वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा गौरव करणाऱ्या गीतामध्ये म्हटले होते याची आठवण करून देत आपण भावभक्तीत अडकलो व बुद्धिवादाला दूर ठेवले, अशी खंत कुबेर यांनी व्यक्त के ली.

साधारणपणे २० शतकाच्या शेवटी समाजमनावरील व राजकारणावरील धर्म-जातीचा पगडा वाढला. पुरोगाम्यांचा दांभिकपणा व लबाडी यामुळे त्यास बळ मिळाले. त्यातून धार्मिक-जातीचे राजकारण हेच प्राप्त परिस्थितीला उत्तर असा समज असणारा आजचा एक कालखंड तयार झाला. तो समज विज्ञाननिष्ठ विचारांनी-शुद्ध विज्ञानबुद्धीची कास धरून दूर करावा लागेल. १८१८ मध्ये पुण्यातील शनिवार वाडय़ावर युनियन जॅक फडकल्यानंतर संपूर्ण भारतावर इंग्रजांचे राज्य आले म्हणजेच महाराष्ट्र पडला की देशावर प्रभुत्व स्थापित होते हे तेव्हापासूनचे वास्तव आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा देशाचे वैचारिक नेतृत्व करत असल्याने तर्कवादाचे पुनरुत्थान होण्यातच महाराष्ट्राचे व देशाचेही हित आहे, असे विवेचन कुबेर यांनी केले.

बुद्धिवादाची जोपासना करण्यासाठी निर्णयाची जबाबदारी घ्यायला आपल्याला शिकावे लागेल व पुढच्या पिढीला शिकवावे लागेल. कर्म काय यावरच भवितव्य ठरणार आहे, ग्रह-ताऱ्यांवर नाही हे लक्षात घ्यावे लागेल, असे कुबेर यांनी स्पष्ट के ले. तसेच प्रत्येक काळात तर्कवादाऐवजी भावनिक गोष्टी-अंधश्रद्धा जोपासणारे बहुसंख्य लोक होते. पण आगरकर असोत की आंबेडकर ते बुद्धिवादाच्या आधारे अशा मंडळींविरोधात उभे राहिले. आज आपण आगरकर व आंबेडकर यांना लक्षात ठेवतो, त्यांना कोण विरोध करत त्या क्षुद्र मनोवृत्तीच्या लोकांची नावेही उरत नाहीत, अशा शब्दांत बुद्धिवादाच्या लढय़ाचे मर्म त्यांनी उलगडून सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदूंचे स्वराज्य नव्हे तर स्थानिकांचे स्वराज्य असा व्यापक तर्क  त्यामागे होता. त्यानंतरचा कालखंड हा राजकीय धामधुमीचा होता. देशात इंग्रजांचे राज्य आल्यावर प्रबोधनाचे पर्व बंगालमध्ये राजा राममोहन रॉय यांनी सुरू के ले. पण त्यानंतर देशातील प्रबोधनाची वाटचाल प्रामुख्याने महाराष्ट्रात झाली. इंग्रजी व आधुनिक विज्ञान शिका म्हणजे इंग्रज काय करत आहेत हे समजेल असा मंत्र देणारे बाळशास्त्री जांभेकर यांनी राज्यात प्रबोधन पर्व सुरू के ले. त्यांचे विचार ऐकायला दादाभाई नवरोजी येत यावरून जांभेकरांची विद्वत्ता लक्षात यावी. त्यानंतर न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी, आगरकर, भांडारकर, गोखले, फु ले व डॉ. आंबेडकर अशी विचारवंतांची एक पिढीच त्या काळात उदयास आली. विशेष म्हणजे या सर्वाना एकमेकांच्या कार्याच्या-मोठेपणाचे भान होते. बुद्धिवादाने ते एकमेकांशी जोडले गेले होते. एकमेकांचा गौरव करण्याची प्रवृत्ती होती. आजच्यासारखे जात-धर्म पाहून कौतुक के ले जात नव्हते, असा चिमटाही कुबेर यांनी काढला.

एखादी व्यक्ती बुद्धिमान आहे म्हणजे त्यांचे सगळेच बरोबर असे समजण्याचा खुळेपणा त्या वेळी नव्हता, तर त्यांच्या चुका दाखवून देण्याचे बौद्धिक धाडस होते असे सांगत लोकमान्य टिळकांनी सुरू के लेल्या गणेशोत्सवामुळे धर्म रस्त्यावर आल्याने नवीन डोके दुखी सुरू होईल, असा इशारा प्रबोधनकार ठाकरे यांनी दिला होता असे उदाहरणही कुबेर यांनी दिले.

भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारे दादासाहेब फाळके , ‘किरण’ नावाचे अर्थसाक्षरता वाढवणारे पहिले नियतकालिक काढणारे महादेव नामजोशी, जवळपास २०० शोध-४० पेटंट मिळवत भारताचे एडिसन अशी आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवलेले शंकर आबाजी भिसे, सर्क सवाले छत्रे ही विविध क्षेत्रांत नवीन काम उभे करणारी सर्व मराठी माणसे होती याकडेही कुबेर यांनी लक्ष वेधले. कार्यक्र माचे प्रास्ताविक वरिष्ठ साहाय्यक संपादक सिद्धार्थ खांडेकर यांनी के ले तर सूत्रसंचालन ‘लोकसत्ता’च्या भक्ती बिसुरे यांनी के ले.

..तर युरोप-अमेरिके त महाराष्ट्रातील बुद्धिवंत शोधावे लागतील!

महाराष्ट्राने आताच तर्कवादाची कास धरली नाही तर १०० वर्षांनी महाराष्ट्रातील बुद्धिवंत आपल्याला युरोप-अमेरिके त शोधावे लागतील, असा सावधगिरीचा इशाराही कुबेर यांनी दिला.

प्रस्तुती : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)

सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. आणि मे. बी. जी. चितळे डेअरी

पॉवर्ड बाय : मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस, पुणे</p>