मुंबई उपनगरीय लोकलमधून दररोज सुमारे ७२ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यांना सेवा-सुविधा देण्यासाठी येत्या रेल्वे अर्थसंकल्पात एक हजार कोटी  रुपयांची तरतूद करावी. तसेच दीर्घकाळ रेंगाळलेली चर्चगेट-डहाणू सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी माजी रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांनी केली.
मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासी भाडेवाढ करण्यात येणार नाही, असे आश्वासन रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांनी जानेवारीमध्ये रेल्वे प्रवासी भाडेवाढ करताना दिले होते. ते आपले आश्वासन पाळतात की प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसतात हे मंगळवारी स्पष्ट होईल, असे सांगून राम नाईक म्हणाले की, रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बन्सल यांनी मुंबईला भेट देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते मुंबईत फिरकलेच नाहीत.
मुंबई नागरी परिवहन प्रकल्प १ व २ पूर्ण करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, मुंबईतील विकास प्रकल्पांची, तसेच प्रवाशांना सोयी आणि स्थानक सुधारणा यांची तपशीलवार माहिती देणारी मुंबई उपनगरी रेल्वेची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी आदी मागण्यांचे निवेदन बन्सल यांना पाठविण्यात आले आहे.