विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे उमेदवार व ज्येष्ठ आमदार हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेस आणि शिवसेना उमेदवारांनी अखेरच्या क्षणी अर्ज मागे घेतल्याने बागडे यांची बिनविरोध निवड झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॉंग्रेस गटनेते राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी त्यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत नेले.

शिवसेनेकडून आमदार विजय औटी आणि काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु, अखेरच्या क्षणी या दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेऊन हरिभाऊ बागडे यांना बिनविरोध निवड करण्यासाठी पाठिंबा दर्शविला. त्यामुळे बागडेंच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी होती. अखेर विधानसभा अध्यक्षपदी बागडेंची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले आणि भाजपच्या बिनविरोध निवडीच्या प्रयत्नांना यश आले.

विधानसभेचे अध्यक्ष बिनविरोध निवडले जावेत, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केली होती. त्यासाठी ते शिवसेना आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चाही फडणवीस यांनी केली होती. त्यामुळे फडणवीस यांच्या शिष्टाई अखेर यश आले आहे. शिवसेनेने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला असला तरी, भाजपच्या विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय सेनेने घेतला आहे.