मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांचे निकटवर्तीय मानले जाणारे दिनेश बोभाटे यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनलयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. बोभाटे यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्याच आधारावर ईडीने तपासाला सुरूवात केली आहे. बोभाटे ठाकरे गटाच्या एका समीतीवर पदाधिकारी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा… जोगेश्वरी सुप्रिमो क्लब प्रकरण : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची पालिकेची तयारी

हेही वाचा… मुंबई : वायू प्रदूषणामुळे मागील काही दिवसांत फ्लूच्या रुग्णसंख्येत २० ते ३० टक्क्यांनी वाढ

सीबीआयच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बोभाटे यांच्याविरोधात १७ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयच्या तपासात बोभाटे याच्यावर दोन कोटी ५८ लाखांची बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, दिनेश बोभाटे हे न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनी लि.च्या लोअर परळ येथील कार्यालयात वरिष्ठ सहायक पदावर कार्यरत असताना १ एप्रिल २०१४ ते ११ जुलै २०२३ या काळात त्यांनी गैरमार्गाने बेहिशेबी संपत्ती गोळा केली, असा आरोपा आहे. ही रक्कम बोभाटे यांच्या एकूण ज्ञात उत्पन्नाच्या ३६.४३ टक्के अधिक म्हणजेच दोन कोटी ५८ लाख ६९ हजार ५७८ रुपये बेहिशेबी मालमत्ता स्वत:च्या आणि पत्नीच्या नावावर गोळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानुसार, भ्रष्ट्राचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली सीबीआयने बोभाटे आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला होता. सीबीआयच्या याच प्रकरणाच्या आधारावर ईडीने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बेहिशोबी मालमत्तेचा वापर कोठे करण्यात आला ? याबाबत ईडी तपास करत आहे.