लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : सर्वसामान्य जनतेला आधुनिक, सुसज्ज, अद्ययावत आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी राज्य सरकारकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने मुंबईतील जे. जे. रुग्णालय, सेंट जॉर्जेस रुग्णालय आणि कामा रुग्णालयात नवीन विभाग सुरू करण्याबरोबरच काही विभागांचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. नवीन विभाग व रुग्णालयातील कक्षांचे या आठवड्यात उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दीपक केसरकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत.

जे. जे. रुग्णालयातील कॅथलॅबमधील यंत्रणा जुनी झाल्याने तेथे नवीन यंत्रणा बसवण्यात आली आहे. नवीन यंत्रणा सुरू झाल्यानंतर दररोज अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी आणि हृदयाचा झडपा बदलण्याच्या १५ शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे. तर दरवर्षी पाच हजार रुग्णांची शस्त्रक्रिया होणार आहेत. त्यामुळे यापुढे रुग्णांना अधिक चांगले उपचार मिळण्यास मदत होईल. जे जे रुग्णालयात चार नवीन कक्षांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यात बालरोग शस्त्रक्रिया, कान नाक घसा शस्त्रक्रिया, मज्जातंतू शस्त्रक्रिया विभाग आणि अन्य एका कक्षाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. हे चारही कक्ष सोयी सुविधांनी सुसज्ज आहेत. त्यामुळे रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. तसेच रुग्णालयात आणखी चार कक्षांच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. हे काम मार्च अखेरीस पूर्ण होणार असल्याची माहिती जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी दिली.

आणखी वाचा-कल्याण ते तळोजा मेट्रो १२ कामाला अखेर सुरुवात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज कामास आरंभ

जे.जे. रुग्णालयाप्रमाणे सेंट जॉर्जेस रुग्णालयात अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेले यकृत प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून एक शल्य विशारद, एक चिकित्सक, एक जठराच्या रोगांचे तज्ज्ञ आणि निवासी डॉक्टरांची तुकडी नियुक्त केली आहे. तसेच या केंद्रात यकृत प्रत्यारोपण करण्यासाठी एच एन रिलायन्स रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. रवी मोहांका यांच्याशी करार करण्यात आला आहे. त्यानुसार डॉक्टर रवी मोहांका आणि त्यांची टीम सेंट जॉर्जेस रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणासाठी येणाऱ्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करतील. तसेच रुग्णालयातील डॉक्टरांना यकृत प्रत्यारोपण करण्याचे प्रशिक्षण देतील. यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबाबतची प्रक्रिया सुरू असून पुढील एक ते दीड महिन्यांत प्रत्यारोपणासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.

वंध्यत्वामुळे त्रस्त पालकांना स्वस्त दरात उपचार मिळावेत आणि त्यांची माता-पिता होण्याची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी कामा रुग्णालयात उभारण्यात येत असलेल्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राचे (आयव्हीएफ) काम पूर्ण झाले आहे. राज्य सरकारच्या रुग्णालयातील हे पहिले कृत्रिम गर्भधारणा केंद्र आहे. या केंद्राचेही या आठवड्यात उद्घाटन होणार आहे. त्यामुळे अनेक महिलांचे आई होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार असल्याची माहिती कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.

आणखी वाचा-पालिकेच्या शाळेतील शिक्षक कचाट्यात, दोन दिवस निवडणुकीचे काम चार दिवस शाळा

यकृताच्या आजारासाठी विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरु करणार

यकृत प्रत्यारोपणाप्रमाणेच रुग्णालयामध्ये यकृता संदर्भातील अन्य आजारांवरही उपचार व्हावेत यासाठी सेंट जॉर्जेस रुग्णालयात विशेष बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे. या विभागात शल्य विशारद, चिकित्सक, एक जठराच्या रोगांचे तज्ज्ञ आणि निवासी डॉक्टरांची तुकडी नियुक्ती केली आहे, अशी माहितीही जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inauguration of wards at j j hospital st georges and cama hospital mumbai print news mrj
Show comments