सुशांत मोरे

खासगी कंपन्यांत काम करणारे ३४ प्रवासी अडचणीत; रेल्वेचे थेट कंपन्यांनाच पत्र

लोकलमधील अपंगासाठीच्या राखीव डब्यात बेकायदा प्रवास करणाऱ्या ३५ खासगी नोकरदार प्रवाशांना ही घुसखोरी चांगलीच भोवणार आहे. रेल्वे अशा घुसखोर नोकरदार प्रवाशांच्या कंपन्यांनाच थेट पत्र लिहून व दाखल तक्रारीची प्रत पाठवून माहिती दिली आहे. त्यामुळे प्रवासात केलेला नियमभंग या नोकरदारांना कामाच्या ठिकाणी भोवण्याची शक्यता आहे.

अपंगांच्या डब्यातून बेकायदा प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच सरकारी व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाकडून नामी शक्कल लढवली जात आहे. उपनगरीय रेल्वे गाडय़ांमध्ये अपंगांच्या डब्यात सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई आहे. मात्र या डब्यात नेहमीच घुसखोरी होते. वारंवार कारवाई करूनही सामान्य प्रवाशांना त्याचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे घुसखोरी करणाऱ्या सरकारी व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच त्यांच्या कार्यालय प्रमुखाला पत्र पाठवून त्याच्याकडून सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी होणाऱ्या नियमभंगाची माहिती करून दिली जाणार आहे. कंपनीने त्या कर्मचाऱ्याला समज द्यावी किंवा नियमभंगाबद्दल कारवाई करावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात येणार आहे.

रेल्वेने २५ जुलैपासून गर्दीच्या स्थानकात विशेष मोहीम राबवून अपंगांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्या २६३ जणांना पकडले आहे. यात ३४ कर्मचारी मालाड, अंधेरी, घाटकोपर, दादर, सायन, डोंबिवली, कळवा या

ठिकाणी असलेल्या छोटय़ा-मोठय़ा खासगी कार्यालयात काम करणारे आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच त्यांच्या कार्यालयांनाही पत्र पाठवण्यात आल्याची माहिती सहाय्यक सुरक्षा आयुक्त अरुण त्रिपाठी यांनी दिली. अपंगासाठी राखीव डब्यातून प्रवास करणे सामाजिक गुन्हा असल्याचे कार्यालयांना पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना समज देण्याची सूचना यात करण्यात आली आहे. किमान आपल्या कार्यालयाची बदनामी होत असल्याच्या भितीने तरी प्रमुखांकडून या नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना समज दिली जाईल, अशी अपेक्षा त्रिपाठी यांनी व्यक्त केली.

हजारो प्रवाशांवर कारवाई

जानेवारी २०१९ ते जुलै २०१९ मध्ये अपंगांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्या ९ हजार १७३ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. यातून २२ लाख ३६ हजार रुपये दंड वसुल केला आहे. दंड न भरणाऱ्या दोन जणांना तुरूंगाची शिक्षा भोगावी लागली आहे.   अपगांच्या डब्यातील घुसखोरी

दिवस          गुन्हे दाखल

२५ जुलै             ५४

२६ जुलै             ४९

२९ जुलै              ६१

३० जुलै             ९९