स्थानिक संस्था कराला (एलबीटी) विरोध करत व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या ‘दुकाने बंद’ आंदोलनावर आज, सोमवारी तोडगा निघण्याची चिन्हे आहेत. प्रदेश काँग्रेसने केलेल्या विनंतीनंतर नोंदणीची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढविण्याचे आणि कारवाईसाठी सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांची मान्यता घेण्याची तरतूद करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले आहे. याबाबत सोमवारी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीची बैठक होणार असून त्यात व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
एलबीटीच्या मुद्दय़ावर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष जनार्दन चांदुरकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. व्यापाऱ्यांकडून एलबीटीबाबत पसरवल्या जात असलेल्या गैरसमजाबाबत तसेच व्यापाऱ्यांच्या शंकांबाबत या वेळी चर्चा झाली. त्या वेळी व्यापाऱ्यांच्या आग्रहाखातरच हा कायदा आणला असून त्यांच्या सर्व अडचणी आणि शंका दूर करण्याची सरकारची तयारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच व्हॅटच्या धर्तीवरच नोंदणीची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढविण्याचा आणि एखाद्या व्यापाऱ्यावर छापा टाकण्यासाठी आयुक्तांऐवजी सचिवांची परवानगी घेण्याबाबतची तरतूद करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले. तसेच एलबीटीवरून लोकांमध्ये पसरवले जात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनजागृती करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. त्यावर काँग्रेसच्या माध्यमातून सरकारची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यात येईल, असे पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले.

..तर आम्ही दुकाने उघडू – राज ठाकरे</strong>
स्थानिक संस्था कराला (एलबीटी) विरोध करण्यासाठी गेले काही दिवस व्यापाऱ्यांनी बंद पाळला. त्यामुळे लोकांचे अतोनात हाल होत आहेत. आता सर्वोच्च न्यायालयानेही निकाल दिला असून तुमच्या मागण्यासाठी सरकारशी जरूर चर्चा करा. मात्र यापुढे दुकाने बंद ठेवून जनतेला वेठीस धरल्यास मनसेला तुमची दुकाने उघडावी लागतील, असा सज्जड दम मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी दिला.  काही ठिकाणी दुकाने सुरू करण्यात आली आहेत, तर काहीजण अजूनही दुकाने बंद ठेवून जनतेला वेठीस धरू पाहात आहेत. तुमच्या मागण्यांसाठी सरकारशी जरूर वाटाघाटी करा, मात्र लोकांना वेठीला धरण्याचे उद्योग यापुढे मनसे सहन करणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे. यापूर्वीही एलबीटीला समर्थन मिळावे म्हणून व्यापाऱ्यांच्या संघटनेने राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळीही दुकाने बंद ठेवून लोकांना त्रास देऊ नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही व्यापाऱ्यांच्या संघटनांनी दुकाने बंद ठेवून दादागिरी केली. त्यामुळे हा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.