अनिश पाटील

लॉरेन्स हा तुरुंगातून त्याचा भाऊ अनमोल आणि साथीदार रोहित हे टोळी चालवित असल्याचा आरोप आहे. अनमोलनेच सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबादारी स्वीकारली होती.

पंजाब, राजस्थान आणि हरियाणामध्ये सक्रिय असलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीने कॅनडामध्येही पसारा वाढवला आहे. उत्तरेकडे सक्रिय असलेल्या या टोळीने थेट मुंबईत येऊन अभिनेता सलमान खानच्या घराजवळ गोळीबार केल्यामुळे देशभर हे प्रकरण गाजत आहे. याप्रकरणात लॉरेन्स बिष्णोई टोळीचा सहभाग असून या गोळीबारानंतर रोहित गोदाराचे नाव चर्चेत आले आहे. गोदाराच्या सांगण्यावरून सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. गेल्या काही वर्षांत या टोळीने आपली दहशत निर्माण करण्यासाठी अनेक प्रसिद्ध व्यक्तींना धमकी व हत्या घडवून आणल्या आहेत.

करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची राहत्या घरी ५ डिसेंबर २०२३ रोजी हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी रोहित गोदाराने घेतली होती. त्याचबरोबर हरियाणामधील भंगाराची खरेदी-विक्री करणारा व्यावसायिक सचिन गोदाराच्या हत्येची जबाबदारी त्याने घेतली होती. भारतातील प्रमुख कारवाया रोहित गोदारामार्फत केल्या जात असल्याचे बोलले जात आहे. कॅनडामध्ये राहून तो लॉरेन्सचा साथीदार गोल्डी ब्रारसाठी काम करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. गोदारा हा राजस्थानमधील बिकानेरच्या कपुरीसर गावचा रहिवासी आहे. त्याच्यावर राजस्थानमध्ये खंडणीसह विविध प्रकरणात ३३ गुन्हे दाखल आहे. लॉरेन्सच्या इशाऱ्यावरून त्याने सीकरमध्ये राजू ठेहट यांची हत्या केली होती. लॉरेन्स हा तुरुंगातून त्याचा भाऊ अनमोल आणि साथीदार रोहित हे टोळी चालवित असल्याचा आरोप आहे. अनमोलनेच सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबादारी स्वीकारली होती. लॉरेन्स तुरुंगात असूनही त्याची टोळीची दहशत कमी झालेली नाही. रोहित गोदारा हा लॉरेन्सच्या अत्यंत जवळचा साथीदार आहे. रोहित गोदाराला बिकानेरमध्ये सराईत गुन्हेगार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. १३ वर्षांमध्ये किमान १५ वेळा त्याला अटक झाली आहे. तुरुंगात असताना तो लॉरेन्सच्या संपर्क आला. लॉरेन्सचा संपर्क आणि गुन्ह्यात प्रत्येक वेळी जामीन मिळाल्याने त्याच्या गुन्हे वाढतच गेले. लोकांना धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी उकळल्याचे रोहित गोदारावर आरोप आहेत.

हेही वाचा >>> लांबपल्ल्यांच्या रेल्वेत सापडली ६० लाखांची रोकड

प्रसिद्ध गायक सिद्धु मुसेवाला हत्येत लॉरेन्स बिश्नोईचा सहभाग होता. या प्रकरणानंतर ही टोळी चांगलीच चर्चेत आली. या हत्येत राज्यातील संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ यांचीही नावे चर्चेत आली होती. त्यावेळी ही टोळी इतर राज्यांमध्येही जाळे पसरवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. अभिनेता सलमान खानला या टोळीच्या नावने धमकाण्यात आल्याचेही उघड झाले होते. गंभीर बाब म्हणजे या टोळीने सलमानची माहिती मिळविण्यासाठी त्यांचे हस्तकही मुंबईत पाठवले. याप्रकरणी रोहित गर्ग, गोल्डी भाई आणि लॉरेन्स बिष्णोई यांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार वांद्रे पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. लॉरेन्स बिष्णोईचा जन्म पंजाबमधील उच्चभ्रू कुटुंबात झाला. त्याने अबोहर येथील कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्याचे आई – वडील लविंदर आणि सुनीता सुरूवातीपासूनच श्रीमंत होते. त्यांची वडिलोपार्जीत शेकडो एकर जमीन आहे. तसेच लॉरेन्सचे कुटुंबिय चांगल्या पदावर कार्यरत आहेत. लविंदर हे पोलीस हवलदार पदावर होते.त्याच्या वडिलांना त्याला पोलीस अधिकारी बनवायचे होते. पण लॉरेन्सने वेगळा मार्ग निवडला. महाविद्यालयात असतानाच त्याने विद्यार्थी संघटना स्थापन केली होती. त्या माध्यमातून पुढे त्याने टोळी उभी केली. चंदीगडमध्ये शिक्षणासाठी गेल्यावर लॉरेन्सने गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला. त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. लॉरेन्स विरोधात पंजाब, दिल्ली, राजस्थान येथे गुन्हे नोंद आहेत. भरतपूर कारागृहानंतर त्याला दिल्लीच्या तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले. पण तेथूनही त्याच्या कारवाया सुरूच आहेत. देशभरात सध्या या टोळीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे या टोळीच्या नावाने धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याचेही बोलले जाते. कॅनडामध्ये गेल्या काही वर्षांत झालेल्या टोळी युद्धामध्येही बिष्णोई टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे.