मुंबई : सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आलेल्या दुरांतो एक्स्प्रेसमधील एका पार्सलमध्ये ६० लाखांची रोख रक्कम सापडली. ही रक्कम सापडल्यानंतर याबाबतची माहिती प्राप्तीकर विभागाला देण्यात आली आहे. सीएसएमटी स्थानकामधील फलाट क्रमांक १७ वर तपासणीदरम्यान ही रक्कम सापडल्याचे सूत्रांनी सांगितले. सीएसएमटी स्थानकावर मंगळवारी दुरांतो एक्स्प्रेस पोहोचली. यावेळी रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेमध्ये तपासणी केली. तपासणीदरम्यान फलाटावर एक संशयीत पार्सल आढळले. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी याबाबतची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. त्यानुसार घटनास्थळी रेल्वे पोलीस पोहोचले. त्यांनी तपासणी केली असता आत कपडे होते. तसेच कपड्यांच्या आत रोख रक्कम असल्याचे निदर्शनास आले. या कपड्यांमध्ये ६० लाख रुपयांची रोकड सापडली असून त्यातील बहुतांश चलनी नोटा ५०० रुपयांच्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : मराठा आरक्षण : प्रवेश, नोकऱ्यांवर टांगती तलवार; नियुक्त्या अंतिम निर्णयाच्या अधीन – उच्च न्यायालय

या पार्सलवर एका व्यक्तीचे नाव आणि पत्ता नोंदण्यात आला आहे. नियमानुसार १० लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम असल्यास त्याबाबतची माहिती प्राप्तीकर विभागाला देणे बंधनकारक असते. त्यामुळे प्राप्तीकर विभागाला याबाबतची माहिती देण्यात आली असून प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे ही रक्कम सुपूर्द करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपासणी करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : मुंबईतील दहा वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद; मुंबई, ठाणेकरांची आजही होरपळ

सध्या लोकसभा निवडणुका असल्यामुळे सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून संशयीत सामानाची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू असतानात घाटकोपर येथे ७२ लाख रुपयांची रोकड स्थानिक पोलिसांना सापडली होती. ती एका बांधकाम व्यावसायिकाची असल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत प्राप्तीकर विभाग अधिक तपास करीत आहे.