Premium

मुंबई : भाडे नाकारणाऱ्या ४८५ रिक्षा, टॅक्सी चालकांचा परवाना निलंबित

मुजोर रिक्षा, टॅक्सी चालकांकडून भाडे नाकारणे, प्रवाशांनी गैरवर्तन करणे, जादा भाडे आकारणे असे प्रकार मुंबईत दररोज सर्रासपणे घडत असतात. हे प्रकार रोखण्यासाठी आरटीओने प्रवाशांना तक्रार करण्यासाठी व्हाॅट्सॲप क्रमांक आणि ई-मेल उपलब्ध केला आहे.

License suspended rickshaw drivers
मुंबई : भाडे नाकारणाऱ्या ४८५ रिक्षा, टॅक्सी चालकांचा परवाना निलंबित (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : मुजोर रिक्षा, टॅक्सी चालकांकडून भाडे नाकारणे, प्रवाशांनी गैरवर्तन करणे, जादा भाडे आकारणे असे प्रकार मुंबईत दररोज सर्रासपणे घडत असतात. हे प्रकार रोखण्यासाठी आरटीओने प्रवाशांना तक्रार करण्यासाठी व्हाॅट्सॲप क्रमांक आणि ई-मेल उपलब्ध केला आहे. गेल्या चार महिन्यांत त्यावर १,३१७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये वडाळा आरटीओमधील ५४९ तक्रारींचा समावेश असून यापैकी ४८५ रिक्षा, टॅक्सी चालकांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रवाशांबरोबर गैरवर्तन केल्याचे निदर्शनास येताच संबंधित रिक्षा व टॅक्सी चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यास वडाळा आरटीओने सुरुवात केली आहे. तसेच प्रवाशांना दररोजच्या या त्रासातून सुटका मिळवी यासाठी ९१५२२४०३०३ व्हाॅट्सॲप क्रमांक, mh03autotaxicomplaint@gmail.com हा इ-मेल जुलै २०२३ पासून उपलब्ध केला आहे. त्याला प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यावर प्रवासी दररोज तक्रारी दाखल करीत आहेत. जुलै ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत त्यावर ५४९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी ४५६ तक्रारी या रिक्षा आणि ९३ तक्रारी या टॅक्सी संदर्भातील होत्या. ५४९ तक्रारींपैकी ४०८ तक्रारी ठोस कारणाशिवाय भाडे नाकारणे, ४५ तक्रारी या जादा भाडे आकारणे, ९६ तक्रारी या प्रवाशांबरोबर गैरवर्तन करणे याबाबत होत्या. वडाळा आरटीओद्वारे सर्व तक्रारींचे निवारण करून दोषी वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे.

हेही वाचा – मुंबई : प्राणवायू निर्मिती प्रकल्प गैरव्यवहाराप्रकरणी ईडीकडूनही गुन्हा दाखल

५४९ परवानाधारकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी करण्यात आली असून दोषी आढळलेल्या एकूण ४८७ परवानाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. ठोस कारणाशिवाय भाडे नाकारल्याप्रकरणी ४८७ पैकी ३७१ परवानाधारकांचा परवाना १५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आला असून ४३ वाहनधारकांकडून एक लाख आठ हजार रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

हेही वाचा – मुंबई : मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

प्रवाशांबरोबर गैरवर्तन केल्याप्रकरणी ९६ परवानाधारकांचा परवाना १० दिवसांसाठी निलंबित करण्यात आला असून ८ वाहनधारकांकडून १२ हजार रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. जादा भाडे आकारल्याप्रकरणी ३६ परवानाधारकांचा परवाना १० दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. ११ वाहनधारकांकडून ३५ हजार रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. एकूण ६२ प्रकरणी वडाळा आरटीओने १,५५,००० रुपये तडजोड शुल्क वसूल केले आहे. यासह उर्वरित प्रकरणाबाबत कार्यवाही सुरू आहे. तसेच २१ प्रकरणांमध्ये चुकीची तक्रार नोंदविण्यात आल्याचे तक्रारदारांना सांगण्यात आले आहे, अशी माहिती वडाळा आरटीओकडून देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: License suspended for 485 rickshaw taxi drivers refusing fare mumbai print news ssb

First published on: 01-12-2023 at 23:42 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा