मुंबई महानगरपालिकेतील अणुशक्ती नगरमधील प्रभाग क्रमांक १४५ चे एमआयएमचे माजी नगरसेवक शहनवाज शेख यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. वर्षा निवासस्थानी सभारंभपूर्वक त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या वर्षभरात मुंबईतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी एक एक करत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आतापर्यंत तीसहून अधिक माजी नगरसेवकांनी ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. शिंदे यांच्या गटाने त्यानंतर मुंबईतील कॉंग्रेसची ताकद कमी करण्याचाही प्रयत्न केला. कॉंग्रेसच्या पाच नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ‘मेट्रो १’वरील प्रवासी संख्या ९० कोटीवर

सायन कोळीवाडा येथील माजी नगरसेविका पुष्पा कोळी, चांदिवलीतील वाजिद कुरेशी, धारावीतील माजी नगरसेवक आणि सिद्धिविनायक ट्रस्टचे विश्वस्त भास्कर शेट्टी, बब्बू खान, कुणाल माने व माजी नगरसेविका गंगा कुणाल माने यांनी कॉंग्रेसमधून शिंदे यांच्या शिवेसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका धनश्री भरडकर यांनीही यापूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला. त्यातच आता शिंदे यांच्या पक्षाने एमआयएमच्या एका माजी नगरसेवकालाही आपल्या पक्षात आणले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत एमआयएमचे दोन उमेदवार विजयी झाले होते. त्यात अणुशक्तीनगर येथील शहनवाज शेख यांचा समावेश होता. त्यांनी आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. ऑगस्टमध्ये ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम काते यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांची सून माजी नगरसेविका समृद्धी काते यांनीही ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला होता. आता याच अणुशक्तीनगरमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेने आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदे गटाला मुंबईत आपले बस्तान बसवण्यासाठी जिंकून येणाऱ्या उमेदवारांची जमवाजमव करावी लागणार आहे. त्याचीच तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mim former corporator join shinde shiv sena mumbai print news zws
Show comments