मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे यांच्यावर चाकू व गुप्तीने हल्ला झाल्याची घटना चांदिवली परिसरात घडली आहे. याप्रकरणी मनसे कामगार सेनेचे पदाधिकारी गजानन राणे व प्रतिक राणे यांच्यासह १५ ते २० कार्यकर्त्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा साकीनाका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यासाठी ते सर्व एकत्र आले असता पार्टे यांच्यावर हल्ला झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी साकीनाका पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा >>> मुंबई: खड्डे भरण्याच्या कामासाठीही निवडणूक आयोगाची परवानगी घेणार; पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करणार

तक्रारदार राज पार्टे घाटकोपर पश्चिम येथील रहिवासी असून मनसेच्या कामगार सेनेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांना उपचारासाठी घाटकोप येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी गजानन राणेे, प्रतिक राणे, अण्णा लोखंडे, चेतन मेमन, आकाश जाधव व १५ ते २० कार्यकर्त्यांविरोधात याप्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गजानन राणे व प्रतिक राणे दोघेही मनसे कामगार सेनेचे पदाधिकारी आहेत. पार्टे यांचा कार्यकर्ता विजय निकम याच्यासोबत झालेल्या वादाबाबत चर्चा करण्यासाठी आपण भेटायला येत असल्याचे गजानन राणे यांनी कळवले होते. त्यानुसार सर्वजण चांदिवली येथील अन्सा इंडस्ट्रीजमधील प्रवेशद्वार क्रमांक १वर भेटले. त्यावेळी आरोपींनी तक्रारदार पार्टे यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. यावेळी चाकू, गुप्ती, लोखंडी सळ्यांनी तक्रारदार यांच्यावर हल्ला करण्यात आला. गाड्यांचे नुकसान करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे उपायुक्त(परिमंडळ-१०) मंगेश शिंदे यांनी सांगितले.