मुंबई : एकीकडे पावसाळा सुरू झाल्याने वातावरणात झालेला बदल, तर दुसरीकडेकरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे मुंबईकर ताप, सर्दी, खोकल्याने हैराण झाले आहेत. करोना आणि अन्य विषाणूजन्य आजार यांची लक्षणे साधारण सारखीच असल्याने रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होत असून यामुळे भितीचे वातावारण वाढत आहे. पावसाळा सुरू होताच हवेतील गारवा वाढत असून अन्य विषाणूजन्य आजारांनी डोके वर काढायला सुरूवात केली आहे. सध्या ताप, सर्दी, खोकला, घशाचा संसर्ग, अंगदुखी अशा तक्रारी घेऊन रुग्णालया वा दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास ४० टक्क्यांनी वाढली आहे. यामध्ये अन्य विषाणूजन्य आजारांसोबतच करोनाची बाधा झालेल्या रुग्णांचाही समावेश आहे.

दोन्ही आजारांची लक्षणे समान असल्यामुळे ताप, सर्दी, खोकल्याने त्रस्त होत असलेल्या रुग्णांना आपल्याला करोना झाला आहे अशी धास्ती वाटत असल्याचे फॅमिली फिजिशयन डॉ. संजीवनी राजवाडे यांनी सांगितले. बहुतांश रुग्णांमध्ये ताप, सर्दी, घसादुखी हीच लक्षणे असून अन्य विषाणूजन्य आजारांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवस ताप कमी होत नसल्यास किंवा बरे वाटत नसल्यास रुग्णांना आम्ही करोना चाचणी करण्याचा सल्ला देतो. लक्षणे समान असली तरी डॉक्टरांनी सूचित केल्यावर चाचणी करून घेणे गरजेचे आहे, असे बॉम्बे रुग्णालयाचे फॅमिली फिजिशियन डॉ. गौतम भन्साली यांनी सांगितले.

करोना चाचणीची टाळाटाळ

अन्य विषाणूजन्य आजार असल्यास साधारण ४८ तासांमध्ये बरे वाटायला लागते. ताप कमी होतो. परंतु ज्या रुग्णांमध्ये ताप कमी होत नाही. तीन दिवसानंतरही लक्षणे असतात, अशा रुग्णांना करोना चाचण्या करण्यास सांगितले जाते. परंतु अनेकदा रुग्ण भीतीने या चाचण्या करण्यास टाळाटाळ करत असल्याचे आढळले आहे. चाचण्या करणे गरजेचे आहे असे वारंवार सांगितल्यावर मग काही रुग्ण स्वयंचाचणी संचाचा वापर करून चाचणी करत असल्याचे डॉ. राजवाडे यांनी सांगितले.

करोना चाचणीचे फायदे

चाचणी केल्यानंतर रुग्ण बाधित असल्याचे आढळल्यास अन्य विषाणूजन्य आजारांप्रमाणेच लक्षणांनुसारच उपचार  करण्यात येतात. परंतु बाधित असल्याचे वेळेत लक्षात आल्यास करोनाचा प्रसार रोखणे शक्य आहे. घरामध्ये ज्येष्ठ नागरिक किंवा अन्य जोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना करोनाची लागण होऊ नये यासाठी आवश्यक काळजी घेता येते. त्यामुळे नागरिकांनी चाचणी करण्यास टाळाटाळ न करता वेळेत निदान करायला हवे, असे मत डॉ. भन्साली यांनी व्यक्त केले.

ही काळजी घ्या

करोना संक्रमणासोबतच हिवताप, डेंग्यू इत्यादी पावसाळी आजारांचा प्रादुर्भावही होऊ शकतो. त्यामुळे दोन ते तीन दिवसांमध्ये लक्षणे कमी होत नसल्यास करोनासह हिवताप, डेंग्यू यांच्या चाचण्या कराव्यात. पावसाळ्यातील आजारांचे निदान आणि उपचार सुरू केल्यानंतरही बरे वाटत नसल्यास करोनाची चाचणी करणेही गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिकांसह, जोखमीच्या गटातील व्यक्तींमध्ये लक्षणे दिसून आल्यास विशेष काळजी घ्यावी. या रुग्णांच्या चाचण्या आणि उपचार वेळेत सुरू करावेत.