– संदीप आचार्य

मुंबई महानगरपालिकेची चार वैद्यकीय महाविद्यालये व प्रमुख रुग्णालयात केवळ मुंबईतीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचाराकरीता जसे येतात तसेच वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थीही येत असतात. महापालिकेची चार वैद्यकीय महाविद्यालये व दंत महाविद्यालये ही अत्यंत प्रतिथयश महाविद्यालये असून या पाचही वैद्यकीय महािवद्यालायंचे ‘अभिमत आरोग्य विद्यापीठ’ बनविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महापालिकेचे जीएस वैद्यकीय महाविद्यालय व केईम रुग्णालय, एलटीएंमजी वैद्यकीय महाविद्यालय व शीव रुग्णालय, बीवायएल नायर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, एचबीटी वैद्यकीय महाविद्यालय व कुपर रुग्णालय आणि नायर दंत महाविद्यालये ही देशातील अग्रगण्य वैद्यकीय महाविद्यालये मानली जातात. देशभरातील वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी प्राधान्याने या महाविद्यालयात प्रवेश घेतात. वैद्यकीय शिक्षण व रुग्णोपचाराचा अनुभव यामुळे बहुतेक विद्यार्थ्यांचा ओढा या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी असून मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांनी आरोग्य खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर महापालिकेने अभिमत (डीम्ड) आरोग्य विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

जागतिक दर्जची वैद्यकीय शिक्षण व्यवस्था अभिमत विद्यापीठाच्या माध्यमातून देता यावी या दृष्टीकोनातून आवश्यक सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यासाठी निविदा जारी करण्यात आली असून जागा व मनुष्यबळाची आवश्यकता जाणून घेऊन सल्लागार एक मसुदा पत्र तयार करतील व हा प्रस्ताव आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुंकडे पाठविला जाईल. कुलगुरू हा प्रस्ताव शैक्षणिक परिषदेत आणि नंतर व्यवस्थापन परिषदेत ठेवतील. तेथील मान्यतेनंतर राज्य सरकारकडे याबाबतचा प्रस्ताव मांडून मंजुरी घेतली जाईल. त्यानंतर संपूर्ण प्रस्ताव विद्यापिठ अनुदान आयोगाकडे (युजीसी) पाठवला जाईल असे सूत्रांनी सांगितले.

मुंबई महापालिकेच्या या अभिमत आरोग्य विद्यापिठाला राज्यशासनाकडून अनुदान मंजूर केले जाईल. तसेच, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाकडून स्वतंत्र होण्याची परवानगी देण्यात येईल. अशी स्वायत्तता मिळाल्यानंतर जुन्या ठराविक अभ्यासक्रमाऐवजी नवीन अभ्यासक्रम, नविन कोर्सेस आणि मुंबई शहराच्या गरजांप्रमाणे आवश्यक असलेले कोर्सेस सुरू करण्याचे स्वातंत्र्य मुंबई महानगरपालिकेला मिळेल. मुंबई महानगरपालिकेच्या अभिमत विद्यापिठाला स्वतःचे शुल्क आकारण्याचे स्वातंत्र्य मिळणार असून हे शुल्क याबाबच्या शुल्क समितीद्वारे नियंत्रित केले जाईल. केंद्र सरकारकडूनही या अभिमत आरोग्य विद्यापीठाला शैक्षणिक अनुदान मिळण्याची शक्यता आहे. तसेच वैद्यकीय शिक्षणात स्वतंत्र ठसा उमटविण्याची संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे. प्रत्येक टप्प्यावर या प्रस्तावाला गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे डॉ.शिंदे यांनी सांगितले.

हे शिक्षण व आरोग्य क्षेत्रासाठी अत्यंत प्रगतीशील पाऊल आहे. या आरोग्य विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर उपनगरीय रुग्णालये आणि विशेष रुग्णालयांचा त्यात समावेश करण्यात येईल तसेच उपनगरीय रुग्णालयातही अधिकाधिक पॅरामेडिकल अभ्यासक्रम सुरू करता येतील असेही अतिरिक्त आयुक्त शिंदे यांनी सांगितले.

महापालिकेच्या चारही वैद्यकीय महाविद्यालयात पदवीच्या एकूण ८३० जागा तर नायर दंत महाविद्यालयात पदवीच्या ६० आणि पदव्युत्तरच्या २० जागा आहेत. या सर्व वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयात एकूण ७१०० रुग्ण खाटा असून वर्षाकाठी बाह्य रुग्ण विभागात ६८ लाख २१ हजार रुग्णांवर उपचार केले जातात याचाच अर्थ दररोज सरासरी या सर्व महाविद्यालयात २१,३०० रुग्णांवर बाह्य रुग्ण विभागात उपचार केले जातात. याशिवाय सोळा उपनगरीय रुग्णायांमध्ये डीएनबीचा अभ्यासक्रम राबविण्यात येत असून यासाठी १८६ डिएनबी अध्यापकांची नियुक्तीही करण्यात आली आहे. या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी १७२ जागा असून ही उपनगरीय रुग्णालये आता छोटी वैद्यकीय महाविद्यालये मानली जात आहेत.

केवळ राज्यातूनच नव्हे तर देशभरातून मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांमध्ये लाखो रुग्ण उपचारासाठी येत असतात जगभरात वैद्यकीय ज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा विस्तार होत आहे. अशावेळी महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांचे अभिमत आरोग्य विद्यापीठ बनल्यास वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये नाविन्यता आणता येईल तसेच भारतातील आरोग्य विषयक गरजा आणि जागतिक वैद्यकीय शिक्षणाचा समन्वय साधून नवीन अभ्यासक्रमही सुरु करता येतील असेही डॉ सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal corporations medical colleges will become opinion health university ssa