मुंबई : घाटकोपरमध्ये दुर्घटनाग्रस्त फलक उभारणाऱ्या जाहिरात कंपनीचे तब्बल आठ फलक दादर परिसरात आहेत. इगो मीडीया या कंपनीचे आठ फलक दादरच्या टिळक पूल परिसरात आहेत. त्यापैकी एका फलकाची लांबी ८० आणि रुंदी १०० फूट आहे. तर घाटकोपर दुर्घटनेतील फलकाइतकाच महाकाय फलक वांद्रे स्थानकाच्या पूर्व परिसरात आहे. या सर्व फलकांना पालिकेने नोटीसा पाठवल्या आहेत.

घाटकोपर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने आता मुंबईतील सर्वच फलकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. मुंबईमधील रेल्वेच्या हद्दीतील एकाही जाहिरात फलकासाठी पालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच पालिका प्रशासनाकडे जाहिरात शुल्कही भरण्यात येत नाही. मुंबईत जास्तीत जास्त ४० फूट बाय ४० फूट आकाराच्या जाहिरात फलकाला मुंबई महापालिका प्रशासन परवानगी देत असते. मात्र रेल्वेच्या हद्दीतील जाहिरात फलक त्यापेक्षा मोठे आहेत.

हेही वाचा…मुंबई : उमेदवारी मागे घेण्यासाठी अपक्ष उमेदवाराला धमकावल्याप्रकरणी गुन्हा, शिंदे गटाचा विभागप्रमुख व सचिवाविरोधात गुन्हा

काही ठिकाणी लांबी रुंदी १२० फूट म्हणजेच १४००० हजार चौरस फुटाचे महाकाय जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. या फलकांना पालिकेची परवानगी नाही. त्यामुळे हे फलक पालिकेच्या लेखी बेकायदेशीर आहेत. पालिकेच्या हद्दीतील एकूण १७९ जाहिरात फलकांपैकी महाकाय अशा फलकांची माहिती पालिकेने गोळा केली आहे. त्यात ४५ ठिकाणी महाकाय फलक असल्याचे आढळून आले आहेत. हे महाकाय फलक ताबडतोब हटवावे यासाठी पालिका प्रशासनाने रेल्वेला नोटीस पाठवली आहे. हे फलक न हटवल्यास आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यांतर्गत ते हटवण्यात येतील, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

महाकाय फलकांपैकी सर्वाधिक १४ फलक हे दादर, वडाळा, नायगावचा भाग असलेल्या एफ उत्तर विभाग कार्यालयाच्या हद्दीत आहेत. हे फलक दादर टिळक पूल, पूर्व द्रुतगती मार्ग शीव, चुनाभट्टी स्थानक परिसरात आहेत. या फलकांची लांबी – रुंदी ४० ते ८० फुटांची आहे. तर घाटकोपरमध्ये दुर्घटनाग्रस्त फलकाइतकाच भव्य फलक वांद्रे स्थानक (पूर्व) परिसरात आहे.

हेही वाचा…के.सी. महाविद्यालयाचे सभागृह भाजपच्या कार्यक्रमासाठी दिल्याने वाद, युवा सेनेकडून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे तक्रार

घाटकोपरच्या दुर्घटनास्थळी आठ फलक ?

घाटकोपरमध्ये दुर्घटना घडली त्या परिसरात तब्बल आठ जाहिरात फलक आहेत. त्यापैकी दोन फलकांची लांबी रुंदी १२० फूट आहे. तर उर्वरित फलकांची लांबी – रुंदी ८० फूट म्हणजेच साडेसहा हजार चौरस फूट इतकी आहे.