मुंबईत पसरलेल्या अतिसार आणि पटकी यांच्या साथीला दूषित पाण्याचा पुरवठा जबाबदार असल्याचे बोलले जात असतानाच मुंबईत तब्बल ४२ ठिकाणी मलवाहिन्यांचे पाणी जलवाहिन्यांमध्ये शिरत असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. दूषित पाणीपुरवठा करणाऱ्या शहरांच्या यादीत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर असल्याचेही एका सरकारी अहवालातून स्पष्ट झाले आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत अलीकडेच महाराष्ट्रातील विविध शहरांतील पाण्याचे तब्बल ९६ हजार नमुने तपासण्यात आले. त्यात दूषित पाणीपुरवठा होत असलेल्या शहरांच्या यादीत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले. मुंबईत दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा फैलाव सुरू झाल्याने महापालिकेने जूनमध्ये तब्बल ३२६९ पाण्याचे नमुने तपासले. त्यापैकी ६६१ ठिकाणचे पाणी पिण्यास पूर्णपणे अयोग्य असल्याचे आढळून आले. तर ४२ ठिकाणी मलवाहिन्यांमधील पाणी जलवाहिन्यांमध्ये जात असल्याचे आढळले. त्यामुळे मुंबईतील काही भागांत कावीळ, हिवताप, अतिसार या आजारांची साथ पसरण्यास सुरुवात झाली आहे.
पालिका म्हणते..
पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये पाणी नदीद्वारे येते. पावसाळ्यात नदीमधील पाणी गढूळ असते. जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये ते शुद्ध केले जाते. मात्र शुद्ध केलेल्या पाण्याच्या रंग पिवळसर दिसतो. परिणामी पाणी दूषित असल्याची भीती मुंबईकरांमध्ये पसरली होती. त्यामुळे पालिकेकडे दूषित पाण्याविषयी तक्रारी आल्या.  पण हे पाणी आरोग्यास धोकादायक नाही, असे प्रमुख जलअभियंता रमेश बांबळे यांनी सांगितले.