मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यातील १२६० घरांचे काम एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण करून घरांचा ताबा दिला जाईल, असे आश्वासन म्हाडाच्या मुंबई मंडळाने रहिवाशांना दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला सर्वात आधी सुरुवात झाली. असे असताना या चाळीचा पुनर्विकास मागे पडला आहे. त्यानंतर वरळी आणि नायगाव चाळींतील पुनर्विकासाचे काम वेगात सुरू झाले आहे. पण ना. म. जोशी मार्ग चाळीचा पुनर्विकास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात होता.

हेही वाचा >>> ‘अटल सेतू’ला वाहनचालकांचा थंडा प्रतिसाद

याची दखल घेत अखेर मुंबई मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी एक संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत म्हाडा अधिकाऱ्यांसह कंत्राटदार कंपनीचे अधिकारी, वास्तुविशारद, तसेच स्थानिक रहिवाशांचा समावेश होता.

यावेळी रहिवाशांच्या सर्व शकांचे निरसन करण्यात आले. कामाला वेग देण्यात आला असून पहिला टप्प्यातील काम एप्रिल २०२६ मध्ये पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिल्याची माहिती ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी दिली.

हेही वाचा >>> न्यायमूर्ती गौतम पटेल सेवानिवृत्त, औपचारिक प्रथेला फाटा देत अन्य न्यायमूर्तींकडून अनोख्या पद्धतीने निरोप

ना. म. जोशी चाळीत अंदाजे २५६० पात्र रहिवासी आहेत. पहिल्या टप्प्यात १२६० रहिवाशांना घरे देण्यात येणार असून एप्रिल २०२६ मध्ये त्यांना घरांचा ताबा देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

रहिवाशांचे समाधान दुसऱ्या टप्प्यात उर्वरित घरे बांधण्यात येणार असून या टप्प्यालाही लवकरात लवकर सुरुवात करण्याचे नियोजन आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यातील रहिवाशांसाठी संक्रमण शिबिराचे गाळे उपलब्ध नसल्याने अडचणी येत आहेत. जर रहिवाशांनी घरभाड्याचा पर्याय स्वीकारून घरे रिकामी केली, तर बांधकाम सुरू करता येईल, असे यावेळी म्हाडा अधिकाऱ्यांनी रहिवाशांना सांगितले. एकूणच या बैठकीत रहिवाशांचे समाधान झाल्याचे नलगे यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: N m joshi marg bdd chawl redevelopment mhada promises for possession of 1260 houses in two years mumbai print news zws