मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर अज्ञात व्यक्तीने विषप्रयोग केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मुंबईतील प्रदूषण लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी महापालिकेने पूर्व द्रुतगती मार्गावर पेल्टोफोरम, सुबाभूळ, पिंपळ आणि फॉक्स टेल पाम या प्रजातींच्या झाडांची लागवड केली होती. घाटकोपर परिसरातही अशाच प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली असून या झाडांची देखभाल पालिकेच्या एन. विभाग कार्यालयातील उद्यान विभागामार्फत केली जाते. काही दिवसांपूर्वी पालिकेचे अधिकारी घाटकोपर पेट्रोल पंपासमोरील झाडांची पाहणी करीत असताना त्यांना काही झाडे मृतावस्थेत आढळली. पाण्याअभावी किंवा इतर कारणांमुळे झाडे मृत झाली असावीत असा त्यांचा अंदाज होता. मात्र त्यानंतर येथील ४० ते ५० झाडे अचानक पूर्णपणे सुकून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांचा संशय बळावला. पालिकेच्या एन. विभागातील काही अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता या झाडांवर विषप्रयोग करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा – मुंबई : जुन्या नोटांची जाहिरात पडली महागात

हेही वाचा – मुंबई: हिमालय पुलाजवळील सरकता जिना आठवड्यातच बंद

  • पेल्टोफोरम, सुबाभूळ आणि पिंपळ या झाडांना छिद्रे पाडून त्यात विष ओतण्यात आले. प्रत्येक झाडावर ५ ते ६ छिद्रे आढळली.
  • पूर्व द्रुतगती मार्ग जंक्शनपूल ते रमाबाई आंबेडकर नगर येथील नाल्यापर्यंत दुभाजकावर असलेल्या २२ फॉक्स टेल पाम प्रजातीच्या झाडांच्या फांद्या तोडून त्यातही विषप्रयोग करण्यात आल्याचे निदर्शनास आले.