प्रीती राठी तरुणीवर अ‍ॅसिड हल्लाप्रकरणी दिल्लीहून ताब्यात घेतलेल्या सत्यम नावाच्या तरुणाची पोलिसांनी सुटका केली आहे. त्याच्याविरोधात कुठलेच पुरावे आढळले नसल्याने त्याची शुक्रवारी रात्री मुक्तता करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी अटकेत असलेल्या पवन गेहलोन याची शनिवारी कसून चौकशी करण्यात आली. परंतु अद्याप त्याच्या सहभागाबद्दल पोलिसांना पुरेसे पुरावे मिळालेले नाहीत.
दिल्लीहून मुंबईत आलेल्या प्रीती राठी या तरुणीवर वांद्रे टर्मिनस स्थानकात २ मे रोजी सकाळी एका अज्ञात तरुणाने अ‍ॅसिडने हल्ला केला होता. या हल्लात प्रीती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर भायखळ्याच्या मसिना रुग्णालयात उपचार सुरू असून तिने एक डोळा गमावला आहे.
या प्रकरणात दिल्लीहून सत्यम नावाच्या तरुणाला ताब्यात घेऊन शुक्रवारी मुंबईत आणण्यात आले होते. पण त्याचा सहभाग स्पष्ट झाला नाही. हल्ल्याच्या दिवशी तो दिल्लीत कामावर असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. प्रीतीच्या जवळच्या मैत्रिणीचा सत्यम हा माजी प्रियकर होता. त्या दोघांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले होते. त्यामुळे चिडून त्याने प्रीतीवर अ‍ॅसिड फेकले असावे, असे पोलिसांना सुरुवातीला वाटले होते. पण त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध दिसून आलेला नाही. याप्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांना हरियाणाहून पवन गेहलोन (२४) या अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला अटक करून गुरुवारी मुंबईत आणले होते. त्याला १७ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. परंतु अद्याप त्याच्याकडून काहीही ठोस माहिती पोलिसांना मिळालेली नाही. शनिवारी त्याची अंधेरी येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. पण हाती काही लागले नसल्याने पोलीस संभ्रमित झाले आहेत.