म्हाडाने गिरणी कामगारांसाठी काढलेल्या विशेष लॉटरीमध्ये घर मिळाले. पण ते पदरात पाडून घेण्यासाठी अद्याप समस्या कायम आहेत, अशा कामगारांचा शुक्रवार, १२ एप्रिल रोजी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने मेळावा आयोजिण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये कामगारांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
म्हाडाने गिरण्यांच्या जागेवर उभारण्यात आलेल्या इमारतींमधील सदनिका गिरणी कामगारांना लॉटरी पद्धतीने गेल्या वर्षी २८ जून रोजी वितरीत केल्या. मात्र या सदनिकांचे पैसे भरणे तसेच अन्य कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे घरे मिळाली तरी ते मिळविण्यासाठी समस्या कायम आहेत, अशी कामगारांची अवस्था आहे. या कामगारांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी १२ एप्रिल रोजी परळच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या मनोहर फाळके सभागृहात मेळावा बोलाविण्यात आला आहे.