लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर त्याची जबाबदारी स्वीकारणारी फेसबुक पोस्ट कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईने केली होती. ते फेसबुक खाते गोळीबाराच्या दिवशीच उघडण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच अनमोल बिष्णोई नावाचे हे फेसबुक खाते उघडण्यासाठी परदेशातील मोबाइल क्रमांकाचा वापर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर पहाटे ५ च्या सुमारास विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल यांनी गोळीबार केल्यानंतर त्याच दिवशी ११ च्या सुमारास अनमोल बिष्णोई नावाच्या फेसबुक खात्यावरून एक पोस्ट अपलोड झाली होती. त्यात खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती. पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्या प्रकरणात सहभागी अनमोलने हा गोळीबार सलमान खानसाठी पहिला आणि शेवटचा इशारा असल्याचे पोस्टमध्ये म्हटले होते.

आणखी वाचा-Megablock Update: मध्य रेल्वेचा दोन दिवसीय रात्रकालीन ब्लॉक

यापुढे भिंतींवर किंवा रिकाम्या घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत, असेही पोस्टमध्ये धमकावण्यात आले होते.आम्हाला शांतता हवी आहे. दडपशाहीविरुद्ध हे आमचे युद्ध आहे. सलमान खान, आम्ही तुला ट्रेलर दाखवण्यासाठी हे केले आहे. त्यामुळे तुला आमच्या क्षमतेची जाणीव झाली असेल. तुझ्यासाठी हा पहिला आणि शेवटचा इशारा आहे. यापुढे भिंतींवर किंवा रिकाम्या घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाही, अशी हिंदीत पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्या नावाचाही वापर करण्यात आला होता. त्यात लॉरेन्स बिश्नोई गट आणि गुंड गोल्डी ब्रार, रोहित गोदारा आणि कला जठारी यांच्या नावांचा शेवटी उल्लेख होता. आयपी ॲड्रेसनुसार ही पोस्ट पोर्तुगाल येथून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. ही फेसबुक पोस्ट खरच पोर्तुगालवरून करण्यात आली की तंत्रज्ञानाच्या साह्याने तसे दाखवण्यात आले, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

आणखी वाचा-मुंबई : पुनर्विकसित इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी!

धमकीची पोस्ट करण्यासाठी त्याच दिवशी म्हणजे १४ एप्रिल रोजी फेसबुक खाते उघडण्यात आले होते. गुन्हे शाखा याप्रकरणी अनमोलला आरोपी करण्याची शक्यता असून त्यासाठी अनमोलविरोधात देशभरात दाखल गुन्ह्यांची माहिती मागवण्यात आली आहे. अनमोल विरोधात पंजाब व चंदीगडमध्ये सुमारे १२ ते १३ गुन्हे दाखल आहेत.