लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथील पायाभूत कामांसाठी दोन दिवसीय रात्रकालीन विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. शुक्रवार-शनिवारी आणि शनिवारी-रविवारी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत (दोन्ही दिवशी प्रत्येकी ४ तास) भायखळा – सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि अप आणि डाऊन जलद मार्गावर, वडाळा रोड – सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक असेल. या कालावधीत लोकल सेवा उपलब्ध नसतील.

ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल मध्यरात्री १२.१४ वाजता सीएसएमटी-कसारा लोकल धावेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल पहाटे ४.४७ वाजता सीएसएमटी-कर्जत लोकल धावेल. ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल रात्री १०.३४ वाजता कल्याण-सीएसएमटी लोकल धावेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल पहाटे ४ वाजता ठाणे-सीएसएमटी लोकल धावेल.

आणखी वाचा-मुंबई : पुनर्विकसित इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी!

हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वीची पहिली लोकल रात्री १२.१३ वाजताची सीएसएमटी – पनवेल लोकल धावेल. ब्लॉक नंतरची पहिली लोकल पहाटे ४.५२ वाजता सीएसएमटी-पनवेल लोकल धावेल. ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल रात्री १०.४६ वाजताची पनवेल-सीएसएमटी लोकल धावेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल पहाटे ४.१७ वाजता वांद्रे-सीएसएमटी लोकल धावेल.

दादरपर्यंतच रेल्वेगाड्या धावणार

ब्लॉक कालावधीत हावडा-सीएसएमटी अतिजलद एक्स्प्रेस, मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस, भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी मेल दादरपर्यंतच धावेल.