अभिनेता संजय दत्तला कारागृहात शिक्षा भोगताना कैद्यांसाठी जेवण तयार करण्याचे काम सोपविले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. गेल्यावेळी संजय दत्त येरवडा कारागृहात होता, त्यावेळी त्याला लाकूडकाम देण्यात आले होते. 
संजय दत्त गुरुवारी मुंबईतील टाडा न्यायालयात शरणागती पत्करणार आहे . सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पैकी १८ महिन्यांची शिक्षा त्याने अगोदरच भोगली असल्याने त्याला आणखी साडेतीन वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे. हीच शिक्षा भोगण्यासाठी तो गुरुवारी न्यायालयापुढे शरणागती पत्करेल.
कारागृहात संजय दत्तला इतर सामान्य कैद्यांप्रमाणेच राहावे लागणार आहे. त्याला कोणतीही विशेष वागणूक मिळणार नाही. दिवसभरात कारागृहात त्याने केलेल्या कामाचा मोबदला म्हणून त्याला २५ रुपये मिळतील. संजयला त्याच्या कुटुंबियांकडून दर महिन्याला १५०० रुपयेही घेता येतील. हा पैसा त्याला कारागृहातील वैयक्तिक कामांसाठी वापरता येईल.
शिक्षा भोगत असताना संजय दत्तला आपल्या कुटूंबातील पाच व्यक्तींची महिन्यातून एकदा भेट घेता येईल. ही भेटही २० मिनिटांसाठी असणार आहे.