मुंबई : लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीमधील जागावाटपाबाबत गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात चर्चा झाली. अद्यापही पाच-सहा जागांचा वाद असून, तो मिटविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा >>> भाजपची पहिली यादी आज? केंद्रीय निवडणूक समितीच्या मेगाबैठकीत विचारमंथन सुरूच

महाविकास आघाडीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने त्यांना २७ जागा सोडण्याचा प्रस्ताव दिल्यामुळे जागावाटपात आणखी पेच निर्माण झाला आहे. या संदर्भातही पवार यांच्याशी काँग्रेस नेत्यांनी चर्चा केली. नव्याने जो जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे, त्याबाबत शरद पवार स्वत: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणार आहेत, असे समजते. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत अचानकपणे वंचित आघाडीच्या वतीने २७ जागांचा प्रस्ताव दिल्याने तसेच काही अटी व शर्ती टाकल्याने आघाडीच्या जागावाटपात काहीसा पेच निर्माण झाला आहे. बाळासाहेब थोरात, नाना पटोले, संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी भेट घेऊन जागावाटपाबाबत चर्चा केली. पाच-सहा जागांबाबत अजून वाद आहे, त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.

महाविकास आघाडीतील कोणता पक्ष किती जागा लढवेल, अशी आकडेवारी आम्ही ठरविलेली नाही, तर निवडून येण्याच्या निकषावर जागावाटप करण्याची आमची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.

कोल्हापूरची जागा शाहू महाराजांसाठी सोडणार

कोल्हापूर मतदारसंघ छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी सोडण्याचे महाविकास आघाडीने ठरविले आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतील याबाबत काही सांगता येणार नाही, परंतु त्यांच्यासाठी कोल्हापूरची जागा सोडण्यावर आघाडीमध्ये सहमती झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.