नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या निश्चितीसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या मेगाबैठकीत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत विचारमंथन सुरू होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत देशभरातील १८ राज्यांतील सुमारे १६०-१८० उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. भाजपच्या उमेदवारांची पहिला यादी शुक्रवारी तीन टप्प्यांत घोषित केली जाण्याची शक्यता आहे.

भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री व पक्षातील वरिष्ठ नेत्यांची नावे समाविष्ट केली जाणार आहेत. त्यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे, शिवराजसिंह चौहान आदी नेत्यांचाही समावेश असेल. या यादीमध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, पश्चिम बंगाल, हरियाणा, तेलंगणा, केरळ, गोवा या राज्यांतील उमेदवारांची संख्या तुलनेत अधिक असेल. पुढील १० दिवसांमध्ये ३००हून अधिक जागांवरील उमेदवारांची घोषणा केली जाऊ शकते. यामध्ये २०१९ मध्ये पराभूत झालेले १६० हून अधिक मतदारसंघांमधील उमेदवार निश्चित होतील. शिवाय राज्यसभेतील मंत्री व मुदत संपुष्टात आलेल्या सदस्यांची नावे असतील.

हेही वाचा >>> हिमाचल प्रदेशची कमळ मोहीम अयशस्वी; निरीक्षकांच्या शिष्टाईनंतर काँग्रेसमधील मतभेद दूर

नेत्यांची गर्दी

केंद्रीय निवडणूक समितीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह यांच्यासह १५ सदस्यांनी उमेदवारांच्या निवडीला हिरवा कंदील दिला असला तरी गुरुवारी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयामध्ये भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह तमाम नेत्यांना पाचारण करण्यात आले होते. त्याशिवाय विविध राज्यांचे उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, प्रभारी, राज्यांतील नेते मुख्यालयात दाखल झाले होते. त्यामुळे समितीचे सदस्य नसलेले वसुंधरा राजे, कैलाश विजयवर्गीय, राजीव चंद्रशेखर यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांची प्रचंड गर्दी भाजपच्या मुख्यालयात झालेली होती.

मोदींचे ४ तास मंथन

भाजपच्या दिनदयाळ उपाध्याय मार्गावरील मुख्यालयामध्ये केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ केंद्रीय नेत्यांची सुमारे ४ तास महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला नड्डा, शहा, राजनाथ सिंह आदी नेते होते. त्यानंतर मोदी पक्ष कार्यालयामध्ये दाखल झाले.

पहिल्या यादीत महाराष्ट्राचाही समावेश

महाराष्ट्रातून समिती सदस्य व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानच्या प्रभारी विजया रहाटकर यांसह भाजपचे अनेक नेतेही उपस्थित होते. समितीच्या बैठकीमध्ये २०२९ मध्ये पक्षाने जिंकलेल्या राज्यातील २३ जागांवर चर्चा करण्यात आल्याचे समजते. राज्यातील महायुतीच्या जागावाटपावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही. शिवसेनेच्या शिंदे गटाने २०१९ मध्ये जिंकलेल्या १८ जागांवर दावा केल्यामुळे सिंधुदुर्ग आदी काही मतदारसंघांबाबतचा वाद कायम आहे. मात्र वादातीत जागांवरील उमेदवारांची घोषणा पहिल्या यादीमध्येच केली जाणार असल्याचे समजते.