राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सोनिया गांधी, मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव यांच्यासह साऱ्या राष्ट्रीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांच्या उपस्थितीबद्दलच काँग्रेसमध्ये तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
पवार १२ डिसेंबरला ७५ वर्षे पूर्ण करीत असून यानिमित्त नवी दिल्लीत १० डिसेंबरला विज्ञान भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १२ डिसेंबरला मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये समारंभ होणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजनाथ सिंग, सुषमा स्वराज, नितीन गडकरी आदी ज्येष्ठ मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव, सीताराम येचुरी, ममता बॅनर्जी, जयललिता आदी साऱ्या नेत्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. मुंबईत होणाऱ्या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगजगतातील बडय़ा हस्तींना निमंत्रण देण्यात येणार आहे.
पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या समारंभाच्या तयारीसाठी राष्ट्रवादीच्या मुख्यालयात आज आढावा घेण्यात आला.
शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या वेळी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.