मुंबई : राज्यातील सत्तेवरून एकीकडे शिवसेना-भाजपातील मतभेद विकोपास गेले असतानाच औरंगाबादच्या नामांतरावरून मात्र हे दोन्ही पक्ष आपापसातील मतभेद विसरून समाजवादी पक्षाच्या विरोधात एकत्र आल्याचे चित्र रविवारी विधानसभेत दिसले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने अखेरच्या दिवशी औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे समाजवादी पक्ष नाराज झाला आहे. ही नाराजी आज विधानसभेत समोर आली. अध्यक्ष निवडणुकीसाठी आघाडीने उभे केलेल्या उमेदवारास मतदान न करता तटस्थ राहण्याची भूमिका समाजवादी पक्षाने घेतली. आम्ही या महाविकास आघाडीला पािठबा दिला, पण उद्धव ठाकरेंनी जाता जाता उस्मानाबाद आणि औरंगाबादचे नाव बदलले म्हणून आम्ही तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याचे आझमी यांनी सांगितले. शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे अबू आझमी यांच्या भाषणावर आक्षेप घेतला. आझमी यांनी मुसलमानांची शहरे असा उल्लेख आपल्या भाषणात केला. छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारणाऱ्यांचे नाव शहराला का ठेवायचे अशी विचारणा करीत जाधव यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले. तसेच आझमी दोन समाजात वाद वाढविण्याचे वक्तव्य करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपचे हरिभाऊ बागडे यांनीही जाधव यांच्या भूमिकेला समर्थन देत औरंगाबदच्या नामांतराचे स्वागत केले.