कळवा येथील ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात एका विद्यार्थ्यांवर रॅगिंग करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रशासनाने निलंबित केले असून, त्यांना परीक्षेला बसण्याची परवानगीही देण्यात येणार नाही. तसेच आरोपी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे वसतिगृह खाली करण्याची नोटीसही बजाविण्यात आल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाने दिली. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी शरद पाटील शुक्रवारी रात्री स्वत:हून कळवा पोलिसांसमोर हजर झाला. त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
गुरुवारी मध्यरात्री एमबीबीएसच्या सहा विद्यार्थ्यांनी हरीश चौधरी याच्यावर रॅगिंग करत ब्लेडने वार केले होते. या प्रकरणाची महाविद्यालय प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू असला, तरीही महाविद्यालय प्रशासनानेही स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. तूर्तास सहा विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे.