५० तिकिटांच्या संग्रहाचे पुस्तक प्रकाशित

मुंबई : महाराष्ट्रातील थोर व्यक्तिमत्त्वे, ठिकाणे, पोशाख, महत्त्वाच्या घटना इत्यादी मराठी संस्कृतीची ओळख सांगणाऱ्या गोष्टींवर आधारित अनेक टपाल तिकिटे आतापर्यंत टपाल विभागाने प्रसिद्ध के ली आहेत. या सर्व तिकिटांचा संग्रह असलेले पुस्तक टपाल विभागाने तयार केले असून या माध्यमातून टपाल विभागासारख्या राष्ट्रीय संस्थेत मराठी संस्कृतीची ओळख जपली जात आहे.

विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांच्या तसेच एखाद्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणाच्या सन्मानार्थ टपाल विभागातर्फे  तिकिटे आणि पाकिटे छापली जातात. काही हौशी संग्राहक या तिकीट आणि पाकिटांचा संग्रह करतात. अलीकडे पत्र पाठवण्याचे प्रमाण कमी झाले असले तरीही टपाल विभागाची लोकप्रियता टिकू न राहावी यासाठी विभागातर्फे  विविध उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या काही वर्षांत प्रकाशित झालेल्या महाराष्ट्राशी संबंधित तिकिटांचा संग्रह असलेले पुस्तक टपाल विभागाने तयार के ले आहे. सध्या हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजीत उपलब्ध असून ५ ऑगस्टपासून विक्रीसाठी ठेवले जाणार आहे. लवकरच याची मराठी आवृत्तीही उपलब्ध करण्याचा टपाल विभागाचा मानस आहे.

तयार करण्यात आलेल्या पुस्तकाची किंमत दोन हजार रुपये असून त्यात ५० मूळ तिकिटेही असणार आहेत. २००३ सालापासूनच्या ५० तिकिटांचा हा संग्रह आहे. यात सचिन तेंडुलकरचा २०० वा सराव सामना, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, मोदक, वडापाव, वारली चित्रकला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक, संत एकनाथ, मुक्ताबाई, बाबा आमटे, कु सुमाग्रज यांच्यावर आधारित टपाल तिकिटांचा समावेश आहे.