जम्मू-काश्मीरमधील पीडीपी सरकारचा भाजपाने पाठिंबा काढल्याचे जाहीर करून देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. परंतु, भाजपाचा हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. जेव्हापासून भाजपा-पीडीपीचे सरकार सत्तेवर आले आहे तेव्हापासून तिथे हिंसाचार वाढला आहे. येत्या निवडणुकीत जनतेला उत्तर द्यावे लागणार आहे. त्यामुळेच त्यांनी ही राजकीय चाल खेळल्याची टीका त्यांनी केली आहे.

ही युतीच मुळात देशविरोधी आणि अनैसर्गिक होती. जम्मू-काश्मीरमधील युतीचे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, असे आमच्या पक्षप्रमुखांनी यापूर्वीच म्हटले होते. आता २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला उत्तर द्यावे लागणार असल्यामुळेच त्यांनी पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतल्याची टीका त्यांनी केली.

ते म्हणाले, हे सरकार सत्तेवर आल्यापासूनच जम्मू-काश्मीरमध्ये हिसांचार प्रचंड प्रमाणात वाढला आहे. आता निवडणुकीवेळी जनता हा प्रश्न विचारणार, त्यामुळे भाजपाने पाठिंबा काढला.

तत्पूर्वी, भाजपाचे जम्मू-काश्मीरचे प्रभारी राम माधव यांनी अचानक पत्रकार परिषदेचे आयोजन करून भाजपाने पीडीपी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे जाहीर कले. मेहबुबा मुफ्ती यांना सरकार योग्य पद्धतीने हाताळता आला नसल्याचे सांगत पाठिंबा काढल्याचे सांगितले. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्याची मागणी त्यांनी केली.