छायाचित्र काढून तक्रार नोंदवता येणार ; शिकाऊ परवान्याची प्रक्रियाही उपलब्ध होणार

कर्णकर्कश आवाजात भोंगे वाजवत बडेजाव मिरवणाऱ्या वाहनचालकांना चाप घालणे आता एका क्लिकवर शक्य होणार आहे. या ‘आवाजी’ वाहनचालकांविरोधात वाहनाच्या छायाचित्रासह तक्रार नोंदविण्यासाठी परिवहन विभागाकडून एक मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. याचबरोबर शिकाऊ परवान्यासाठी आवश्यक प्रक्रियाही या अ‍ॅपच्या माध्यमातून करणे शक्य होणार आहे.

राज्यभरात सध्या सुमारे तीन कोटी वाहने आहेत. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषणाचा आलेख उंचावत आहे. रस्त्यावरून प्रवास करताना इतर वाहनचालकांकडून कर्णकर्कश भोंग्यांचा वापर केला जातो तर धूर ओकणारी वाहने रस्त्यावर चालविली जातात. यातील अनेक वाहनांचे आयुर्मान संपूनही ती रस्त्यावर आहेत. या गोष्टींना चाप घालण्यासाठीही या अ‍ॅपचा वापर होऊ शकणार आहे. या अ‍ॅपवर तक्रार करण्यासाठी नियम मोडणाऱ्या वाहनाचे छायाचित्र टिपून ते अ‍ॅपवर अद्ययावत करावयाचे आहे. दुसरीकडे वाहनांतून निघणाऱ्या धुरामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. यात इतर वाहनांतून निघणाऱ्या विषारी वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे त्रास उद्भवतात. मात्र अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून परिवहन विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने कारवाई होत नसल्याने ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी परिवहन विभागाकडून या अ‍ॅपवर काम केले जात आहे. काही तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांत हे अ‍ॅप उपलब्ध होणार आहे.

अ‍ॅप कसे असेल?

* या अ‍ॅपमध्ये वाहतुकीच्या नियमांसह नियम मोडल्यास काय शिक्षा होऊ शकते त्याचीही माहिती असणार आहे. हेल्पलाइन क्रमांकांसह नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी पर्याय असणार आहेत. वाहनाचे छायाचित्र काढून थेट तक्रार नोंदवता येणार आहे. याची माहिती परिवहन विभागाच्या नियंत्रण कक्षाकडे जाणार आहे. या विभागातून आपल्याला संपर्क साधला जाणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

अ‍ॅपची वैशिष्टे

* या अ‍ॅपद्वारे भाडे नाकारणाऱ्या तसेच मुजोर रिक्षा-टॅक्सी चालकांचीही तक्रार करता येणार आहे. यासाठी वाहनांच्या क्रमांकासह त्या गाडीचे छायाचित्र परिवहन विभागाच्या नियंत्रण कक्षाला पाठवता येईल.

* विशेष म्हणजे शिकाऊ वाहन परवाना काढताना मुलाखतीच्या वेळेसाठी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते. मात्र लवकरच अ‍ॅपद्वारे ही नोंदणी करता येईल.