शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती सुधारत असल्याचे वृत्त कानावर पडताच तमाम शिवसैनिकांनी सुटेकचा नि:श्वास टाकला होता. मात्र मुंबईतील शिवसेना नगरसेवकांची मातोश्रीवर शनिवारी बैठक आयोजित केल्याचे वृत्त पसरताच पुन्हा एकदा अफवांचे वावटळ उठले. बाळासाहेबांच्या प्रकृतीच्या चिंतेने शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिका मुख्यालयातही शुक्रवारी शुकशुकाट पसरला होता.
या संदर्भात महापैर सुनिल प्रभू यांनी सांगितले की, अनेक नगरसेवक शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मातोश्रीवर येत होते. परंतु, अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेमुळे त्यांना आत सोडता आले नाही. नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्व नगरसेवकांना एकत्रित भेट देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. याबाबत कुणी अफवा पसरवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, गेले काही दिवस अनेक नगरसेवक मातोश्रीबाहरे ठिय्या मांडून बसले आहेत, त्यामुळे नागरी कामांवर परिणाम होत आहे. त्यांनी आपल्या प्रभागांमध्ये परतावे आणि नागरी समस्यांकडे लक्ष केंद्रीत करावे, असे आदेश नगरसेवकांना उद्धव ठाकरे देण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सुट्टीनंतर पालिका उघडली. परंतु एकंदरीतच बाळासाहेबांच्या प्रकृतीबाबत कुजबुज आणि चिंतेने कामावरची मरगळ जाणवत होती.