एकीकडे वाहनतळाचे शुल्क वाढवण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करत असतानाच गेली तीन वर्षे कुर्ला पश्चिमेला सुरू असलेल्या बेकायदेशीर पार्किंगकडे ना पालिकेचे लक्ष जात आहे ना वाहतूक पोलिसांचे.. पादचारी आणि बसथांब्यावरील प्रवाशांची या वाहनांमुळे अडचण होत असल्याने दक्ष नागरिकांनी पाठपुरावा केला तेव्हाही पालिका अधिकाऱ्यांनी ताकास तूर लागू दिला नाही. एवढेच नाही पण वाहनतळ अनधिकृत असल्याचे मान्य केल्यानंतर कारवाईसाठी पालिका असमर्थ असल्याचे सांगून हात वर करण्यात आले. त्यामुळे कुर्ला येथील रहिवाशांनी आता वाहतूक पोलिसांकडे दाद मागितली आहे.
दुचाकी, चारचाकी वाहनांचे शुल्क वाढवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून गेली दोन वर्षे प्रयत्न सुरू आहेत. मात्र शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत वाहनतळ सुरू आहेत. या वाहनतळावर उभ्या राहणाऱ्या वाहनांकडून पावती देऊन शुल्क वसूल केले जाते. मात्र ते पालिकेच्या तिजोरीत पोहोचत नाही. कुर्ला पश्चिम येथील अर्पण आर्केडसमोर गेली तीनहून अधिक वर्षे वाहने उभी केली जातात. वाहने उभी केल्याबद्दल काही माणसे शुल्कही वसूल करतात. गाडय़ा उभ्या राहिल्याने बस थांब्याहून लांब उभी राहते. पादचाऱ्यांचा व प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी या वाहनतळाची माहिती घेतली तेव्हा तो पालिकेचा अधिकृत वाहनतळ नसल्याचे लक्षात आले, असे दी. मा. प्रभूदेसाई यांनी सांगितले. कुर्ला ज्येष्ठ नागरिक संघाने माहितीच्या अधिकाराखाली या वाहनतळाची माहिती मागवली