scorecardresearch

साडेसात लाख नागरिकांची दुसऱ्या मात्रेकडे पाठ

करोनाच्या नव्या उत्परिवर्तनाचा धोका वाढू लागला असला तरीही मुंबईतील जवळपास सात लाख ४५ हजार नागरिकांनी प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा घेतलेली नाही.

मुंबईबाहेरील नागरिकांची नावे वगळण्याची पालिकेची मागणी

शैलजा तिवले

मुंबई : करोनाच्या नव्या उत्परिवर्तनाचा धोका वाढू लागला असला तरीही मुंबईतील जवळपास सात लाख ४५ हजार नागरिकांनी प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा घेतलेली नाही. शहरात पहिल्या मात्रेचे लसीकरण १०४ टक्के झाले आहे.  नियोजित वेळ उलटून गेल्यानंतरही हे नागरिक लसीकरणासाठी येत नसल्याने पालिकेची चिंता वाढली आहे. यात मुंबईबाहेरील नागरिकांची संख्याही लक्षणीय असल्याचे सांगत पालिकेने ही नावे वगळण्याची विनंती केली आहे.

शहरातील ७६ टक्के नागरिकांनी दुसरी मात्रा पूर्ण केली आहे.  ‘कोविन’च्या आकडेवारीनुसार, मुंबईत सुमारे सुमारे सात लाख ४५ हजार नागरिकांची दुसऱ्या मात्रेची नियोजित वेळ उलटून गेली तरी ते अजून लसीकरणासाठी आलेले नाहीत. यात सुमारे सहा लाख ७९ हजार नागरिक हे कोविशिल्ड तर सुमारे ६५ हजार हे कोव्हॅक्सिन लस घेतलेले आहेत.

नियोजित वेळ होऊनही दुसरी मात्रा न घेणाऱ्यांचे प्रमाण मुंबईत सर्वाधिक म्हणजेच ६५ हजार ५३४ हे अंधेरी पश्चिम ( के पश्चिम) भागात आहे. तर त्या खालोखाल ग्रॅण्टरोड (५२ हजार ७६८),  मालाड (४७ हजार ४६) आणि भायखळा (४५ हजार ९००) या विभागामध्ये आहे. तर दुसऱ्या मात्रेसाठी सर्वात कमी म्हणजे चार हजार ८६६ नागरिकांनी दुसरी मात्रा घेतलेली नाही.  लसीकरण ज्या विभागात अधिक झाले, तेथे दुसऱ्या मात्रेसाठी न आलेल्यांचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे दुसरी मात्रा पूर्ण न केलेल्यांची संख्या अधिक याचा अर्थ लसीकरण कमी असा होत नाही, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

 दुसरी मात्रा घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. परंतु बरेच जण सुट्टय़ांच्या काळात बाहेरगावी गेलेले आहेत, तर काही जणांना सुट्टय़ांच्या काळात लस घेऊन आजारी पडायच्या भीतीने अजून लसीकरणासाठी आलेले नाहीत. आम्ही दुसरी लस घेऊन कळवतो असेच बहुतेक जण सांगतात. परंतु आम्हाला दुसरी लस घ्यायची नाही, असा प्रतिसाद मिळालेला नाही. ‘आमच्या विभागात सुमारे १० लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यात सर्वाधिक लसीकरण ऑगस्टमध्ये झाल्यामुळे आता बहुतेक नागरिकांच्या नियोजित वेळा झालेल्या आहेत,’ असे अंधेरी (के पश्चिम) विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित पंपटवार यांनी सांगितले.  ‘दुसरी मात्रा राहिलेल्या नागरिकांची यादी मिळाली असून यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधण्यात येत आहे. या नागरिकांना त्यांच्या जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती देऊन लस घेण्यासाठी जाण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. काही नागरिक मात्र आता लस घेणे गरजेचे वाटत नाही, असाही प्रतिसाद देत आहेत,’ असे घाटकोपर विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र खंदाडे यांनी सांगितले.

शहरातील लाभार्थी किती?

मुंबईत राहणारे, मुंबईत पहिली मात्रा घेतलेले, मुंबईबाहेरून पहिली मात्रा घेण्यासाठी आलेले अशी नऊ वर्गामध्ये दुसरी मात्रा न घेणाऱ्यांची वर्गवारी केली आहे. यातील मुंबईबाहेर राहणारे, परंतु पहिली मात्रा इथे घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा घेण्यासाठीही मुंबईत यावे अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. मुंबईतील नागरिकांचे नेमके लसीकरण किती झाले हे जाणून घेणे आवश्यक असून त्यांचा पाठपुरावा करणे हे पालिकेचे काम आहे. यासाठी ‘कोविन’मधून दिलेल्या यादीमधून मुंबईबाहेरील नागरिकांची नावे वगळण्याची मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे, असे काकाणी यांनी सांगितले.

लसीकरणासाठी अधिक सुविधा

लसीकरण वाढविण्यासाठी आराखडा  दुसऱ्या मात्रेचे लसीकरण वेगाने होण्यासाठी पालिकेने आराखडा केला असून याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. यानुसार लोकांच्या सोयीसाठी सोमवारपासून प्रत्येक विभागामध्ये एक ते तीन केंद्रांवर संध्याकाळी पाच ते ११ या वेळेत लसीकरण सुरू केले आहे. दुकाने, आस्थापनांमध्ये लसीकरण वाढविण्यासाठी ‘माझी जबाबदारी’ अशी मोहीम सुरू केली आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’मध्ये झालेल्या नोंदीनुसार नागरिकांचा लसीकरणाचा पाठपुरावाही सुरू करण्यात येणार आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. 

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vaccine corona people citizens ysh

ताज्या बातम्या